परभणी - अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर छापा १.91 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
परभणी, 03 एप्रिल (हिं.स.)। तालुक्यातील समसापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर परभणी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्फोटक पदार्थ, रसायने व साहित्य असा एकूण १ लाख
परभणी - अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर छापा १.91 लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल


परभणी, 03 एप्रिल (हिं.स.)।

तालुक्यातील समसापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर परभणी ग्रामीण पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्फोटक पदार्थ, रसायने व साहित्य असा एकूण १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, समसापूर शिवारातील गट क्रमांक ९४ येथे विनापरवाना फटाके निर्मिती सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी सुमारे सव्वाचार वाजता छापा टाकण्यात आला. यावेळी संजय सदाशिव शिंदे (वय ५६) व सुदर्शन सदाशिव शिंदे (वय ४६, दोघे रा. लहुजीनगर, परभणी) यांना ताब्यात घेण्यात आले. या ठिकाणी सहा खोल्यांची पंचासमक्ष झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान ॲल्युमिनियम पावडर, सल्फर पावडर, विविध रासायनिक पावडर, ग्राउंड बोर्ड, सुतळी बॉम्ब, फ्युज बंडल, सुतळी, दोरी, कात्री, स्टेपलर, प्लास्टिक टेप, शोभेची दारू, तसेच सुतळी बॉम्ब पॅकिंगसाठी लागणारे साहित्य मोठ्या प्रमाणावर आढळून आले. पोलीस उपनिरीक्षक मोहिते यांनी पंचासमक्ष जप्ती पंचनामा करून आवश्यक नमुने तपासणीसाठी घेतले. ज्वलनशील स्वरूपाचा मुद्देमाल असल्याने तो घटनास्थळीच सीलबंद करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहिते, पोलीस नाईक अरविंद धबडे व पोलिस अंमलदार भिकाणे यांनी केली.या प्रकरणी पोलीस नाईक अरविंद धबडे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध स्फोटक पदार्थ अधिनियम १९८४ चे कलम ५ व ६, तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ आणि भारतीय न्याय संहिता कलम ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक जीवन राजगुरू करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande