
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उदगीर येथे यशस्वी सापळा रचत पोलिस निरीक्षकासह दोन जणांना लाच घेताना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराच्या मेव्हण्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आणि मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपींनी 3 लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार 1 एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे प्राप्त झाली होती.
तक्रारीची पडताळणी करताना संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांनी 50 हजार रुपयांची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचण्यात आला. या कारवाईदरम्यान आरोपी पोलीस कर्मचारी राहुल नागरगोजे याने पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या वतीने तक्रारदाराकडून 45 हजार रुपये स्वीकारले.
ही रक्कम स्वीकारल्यानंतर आरोपीने दुसऱ्या आरोपीला फोन करून व्यवहार झाल्याची माहिती दिली. तसेच दुसऱ्या आरोपीनेही फोनवरून लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले.कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम व मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले असून, दोघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस निरीक्षकांकडून करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis