
लातूर, 03 एप्रिल (हिं.स.)।
तालुक्यातील अनेक ठिकाणी अचानकपणे वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने यात पिकांचे आणि फळांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे परिणामी शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.
औसा तालुक्यातील भादा व परिसरामध्ये १ एप्रिलच्या रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने उभे असलेली ज्वारी पूर्णपणे आडवी पडली असून पशुखाद्य म्हणून जो ज्वारीचा कडबा उपयोगात आणला जातो तोही या पावसामध्ये भिजल्याने त्याची प्रतवारी खराब होऊन तो चारा जनावरासाठी खाण्यायोग्य राहत नाही आणि भादा व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळझाडे यामध्ये आंबा मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. या फळांचे वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून यामध्ये शिवाजी मल्हारी हजारे, दयानंद काशिनाथ माळी यांच्यासह भादा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे शासन स्तरावर या भागाची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis