
पुणे, 03 एप्रिल, (हिं.स.)। शिरूर तालुक्याच्या पूर्वभागात सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने व गारपिटीने रांजणगाव सांडस, राक्षेवाडी, आलेगाव पागा, न्हावरे, निर्वी, आंधळगाव, नागरगाव, कोळगाव डोळस या परिसरात मोठे नुकसान केले आहे. विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारांच्या जोरदार सरींनी शेतातील पिके अक्षरशः झोडपून काढली. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वातावरण अचानक ढगाळ झाले आणि काही क्षणांतच गारपिटीसह पावसाने जोर धरला. निर्वी गावात मोठ्या प्रमाणात गारांचा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला असून, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.
परिसरात कांदा काढणी सुरू असताना शेतात पडलेला कांदा भिजल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच गहू, हरभरा, भाजीपाला व चारा पिकांनाही मोठा फटका बसला आहे. आंबा पिकाचेही नुकसान झाले असून, वीटभट्टी व्यावसायिकांच्या कच्च्या विटा पावसामुळे मातीमोल झाल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु