
छत्रपती संभाजीनगर, 03 एप्रिल (हिं.स.)।
जाधववाडीतील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील पंधरा दिवसांपासून गव्हापाठोपाठ ज्वारीचीदेखील आवक वाढली. मात्र, अपेक्षित आवकपेक्षा ही आवक कमीच असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळेच यंदा हंगामातही ज्वारीला चार ते साडेचार हजारांचा भाव मिळत आहे.
यंदाच्या २०२५-२६ च्या हंगामात वरुणराजा चांगलाच
बरसला. त्यामुळे विहिरी तुडुंब भरल्या. परिणामी, यंदा शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी अधिक केली. तर ज्वारीचे पेरणीक्षेत्र घटले. त्यामुळे सध्या जाधववाडी मोंढ्यात गव्हाची आवक वाढलेली आहे. गव्हापाठोपाठ ज्वारीची आवक वाढल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समोर आले. बुधवारी मोंढ्यात २७४ क्विंटल गव्हाची आवक झाली. गव्हाला दर्जानुसार, १,५९५ ते २,५२१ रुपये क्विंटलचा भाव मिळाला. दुसरीकडे २०६ क्विंटल ज्वारीची आवक झाली. २४०० ते ४५०० रुपयांचा भाव मिळाला. ज्वारीचा सरासरी भाव ४३२५ एवढा नोंदला गेला. गतवर्षी हंगामात या वेळेला ज्वारीला दर्जानुसार २ हजारांपासून ३ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला होता. यावेळी मात्र तब्बल हजार ते दीड हजार रुपयांनी अधिक भाव मिळत आहे, असे मन्नू पवार यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis