
इराण युद्धादरम्यान सैन्य नेतृत्त्वात परिवर्तनाचा निर्णय
वॉशिंग्टन, 03 एप्रिल (हिं.स.) : पश्चिम आशियात इराण विरुद्ध इस्त्रायल आणि अमेरिकेचा संघर्ष सुरू असतानाच अमेरिकेतून मोठी बातमी आली आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सैन्य नेतृत्त्वात परिवर्तनाचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे सैन्य प्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांना तातडीने पद सोडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी लष्कर प्रमुखांना सेवानिवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत.
यासंदर्भातील माहितीनुसार जनरल रँडी जॉर्ज यांनी अद्याप अधिकृतपणे राजीनामा दिलेला नसला तरी संरक्षण मंत्रालयाच्या आदेशानंतर ते लवकरच निवृत्ती जाहीर करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अमेरिकेने इराणविरुद्ध संभाव्य जमिनीवरील लष्करी कारवाईची तयारी सुरू केली असून मध्यपूर्वेत मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आले आहे. जनरल रँडी जॉर्ज हे वेस्ट पॉईंट मिलिटरी अकादमीचे पदवीधर असून त्यांनी आखाती युद्ध, इराक आणि अफगाणिस्तानमधील मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. जो बाईडेन यांच्या कार्यकाळात 2023 मध्ये त्यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत असतानाही त्यांना मुदतीपूर्वी पद सोडावे लागत आहे. जनरल जॉर्ज यांच्या हकालपट्टीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासनाच्या लष्करी धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत त्यांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. तसेच, प्रशासनाला अशा नेतृत्वाची गरज असल्याचे सांगितले जात आहे जे राष्ट्राध्यक्षांच्या धोरणांशी पूर्णपणे सुसंगत असेल. ट्रम्प प्रशासन आणि जनरल जॉर्ज यांच्यात धोरणात्मक मतभेद असल्याच्या चर्चाही रंगत आहेत. दरम्यान, इराणशी सुरू असलेला संघर्ष आणि त्यानुषंगाने वाढत्या तणावामुळे पश्चिम आशिया आणइ मध्यपूर्वेतील परिस्थिती अधिकच गंभीर बनत असून जागतिक समुदायाचे लक्ष या घडामोडींवर केंद्रित झाले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी