
इस्लामाबाद , 03 एप्रिल (हिं.स.)।पाकिस्तानने गुरुवारी डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत झालेली ही दुसरी मोठी दरवाढ आहे. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल दरांमध्ये झालेल्या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाकिस्तानने डिझेलची किंमत ५५ टक्क्यांहून अधिक वाढवून प्रति लिटर ५२०.३५ रुपये करण्यात आली आहे, तर पेट्रोलची किंमत सुमारे ५५ टक्के वाढवून प्रति लिटर ४५८.४० रुपये करण्यात आली आहे. गुरुवारी अमेरिकन तेलाच्या किमतींमध्ये ११ टक्क्यांहून अधिक वाढ झाली, तर ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये ७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दिवस आधी लष्करी कारवाई अधिक तीव्र केली जाणार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर ही वाढ झाली.
पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेज मलिक यांनी वित्त मंत्री मुहम्मद औरंगजेब यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले की, अमेरिका-इराण युद्धानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती अनियंत्रित झाल्या असून त्यामुळे दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे. गेल्या महिन्यातही या दक्षिण आशियाई देशाने डिझेल आणि पेट्रोलच्या ग्राहक किमतींमध्ये सुमारे २० टक्के वाढ केली होती. त्या वेळीही इराणवरील अमेरिका-इस्रायल हल्ल्यांमुळे तेल दर वाढल्याचे कारण देण्यात आले होते.
या निर्णयामुळे महागाई वाढण्याची शक्यता असून त्याचा सर्वाधिक फटका पाकिस्तानातील गरीब जनतेला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाकिस्तान मुख्यतः सौदी अरेबिया आणि यूएईमधून होर्मुज सामुद्रधुनीमार्गे तेल आयात करतो.
देशाचे वित्त मंत्री मुहम्मद औरंगजेब यांनी पत्रकार परिषदेत काही अनुदानांची (सब्सिडी) स्वतंत्र घोषणा केली. लहान शेतकरी, मोटारसायकल चालक तसेच शहरांदरम्यान माल व प्रवासी वाहतूक करणाऱ्यांना दिलासा देणे हा या निर्णयाचा उद्देश आहे.
मलिक यांनी सांगितले की, सरकारने गेल्या तीन आठवड्यांत १२९ अब्ज पाकिस्तानी रुपयांची सब्सिडी दिली होती; मात्र आंतरराष्ट्रीय तेल दरांतील प्रचंड वाढ लक्षात घेता ती पूर्वीप्रमाणे सुरू ठेवणे आता शक्य नाही. संसाधने मर्यादित आहेत आणि या युद्धाचा शेवट दिसत नसल्याने सर्वांसाठी समान सब्सिडी देणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode