
रत्नागिरी, 3 एप्रिल (हिं. स.) : मठधामापूर (ता. संगमेश्वर) परिसरात संगणक वर्गासाठी जात असलेल्या चार अल्पवयीन विद्यार्थिनींविरुद्ध एका व्यक्तीने पाठलाग करून अश्लील कृत्य केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. देवरूख पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपी हर्षल सुभाष गवंडी (वय 26, रा. पाटगाव) याला ताब्यात घेतले आहे.
संगमेश्वर पंचायत समितीत लिपिक म्हणून काम करणाऱ्या आरोपी हर्षलने वडिलांच्या अकाली निधनानंतर अनुकंपा तत्त्वावर सरकारी नोकरी घेतली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, घटना 1 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9:30 ते 10 वाजेच्या सुमारास घडली. पीडित विद्यार्थिनी संगणक वर्ग संपवून एसटी बसने ताम्हाणे फाटा येथे उतरल्या होत्या. ते पायी मठधामापूर गुरववाडीकडे जात असताना, पिवळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या आरोपीने त्यांचा पाठलाग केला.
मठधामापूर प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ आरोपीने दुचाकी थांबवून विद्यार्थिनींवर लक्ष ठेवले, आणि काही अंतरावर पुन्हा त्यांच्या जवळ जाऊन चालत्या दुचाकीवर उभे राहून कपडे उतरवत अश्लील कृत्य केले. घाबरलेल्या विद्यार्थिनींनी आरडाओरडा केला, परंतु आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.
घटनास्थळी परतल्यावर विद्यार्थिनींनी पालकांना घटनेची माहिती दिली. पालकांनी मुलींना धीर दिला आणि 2 एप्रिल रोजी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम 78, 79 आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) 2012 कलम 12 नुसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
-------------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी