
रत्नागिरी, 6 एप्रिल, (हिं. स.) : मिरकरवाडा ते गणपतीपुळे दरम्यान नियमित सागरी गस्त घालत असताना मत्स्यव्यवसाय विभागाने अनधिकृत एल.ई.डी. (LED) लावून मासेमारी करणाऱ्या भराडी प्रसन्न नौकेवर कारवाई केली आहे.
गेल्या दि. ३ एप्रिल २०२६ च्या रात्री सुरू झालेल्या या मोहिमेत ४ एप्रिल रोजी पहाटे सव्वादोनच्या सुमारास ही नौका पकडण्यात आली. या कारवाईबाबतची माहिती आज देण्यात आली.
मत्स्यव्यवसाय विभागाच्या अंमलबजावणी अधिकारी तथा जयगडच्या परवाना अधिकारी स्मितल कांबळे आपल्या पथकासह नियमित गस्तीवर होत्या. यावेळी मिऱ्या-काळबादेवी समोर समुद्रात साधारण १०.८३ सागरी मैल अंतरावर 'भराडी प्रसन्न' (नोंदणी क्रमांक IND-MH-04-MM-3723) ही नौका संशयास्पदरीत्या नांगरून उभी असल्याचे आढळले. या नौकेचे मालक कैलास उल्हास कुबल (रा. राजवाडी, भगवती बंदर, रत्नागिरी) असून, नौकेकडे राज्याच्या जलधि क्षेत्रासाठी मासेमारी परवाना आहे. मात्र ही नौका अनधिकृतपणे एल.ई.डी. लावून मासेमारी करण्याच्या उद्देशाने उभी असल्याचे निष्पन्न झाले.
कारवाईदरम्यान नौकेवर तांडेलासह ५ खलाशी आढळले. पथकाने नौकेवरील एल.ई.डी. दिवे आणि जनरेटरसह संपूर्ण नौका जप्त केली असून पुढील कार्यवाहीपर्यंत ती मिरकरवाडा बंदरात सुरक्षित ठेवण्यात आली आहे.
या प्रकरणी महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा) अध्यादेश, २०२१ अन्वये कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
ही मोहीम मत्स्यव्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने राबवण्यात आली. यामध्ये अंमलबजावणी अधिकारी श्रीमती स्मितल कांबळे, सुरक्षा रक्षक सुजन पोवार, सागरी सुरक्षा रक्षक अमोल पिलणकर, अनिकेत पवार आणि भूषण करमरकर यांनी सक्रिय सहभाग घेतला.
अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी या कारवाईचा सविस्तर अहवाल दाखल केला आहे. यानंतर आता या प्रकरणाची रीतसर सुनावणी अभिनिर्णय अधिकारी तथा मत्स्यव्यवसाय विभाग सहाय्यक आयुक्तांच्या न्यायालयात पार पडणार आहे. बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध मत्स्यव्यवसाय विभागाने उचललेल्या या पावलामुळे अवैध मच्छीमारांचे धाबे दणाणले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी