
लातूर, 07 एप्रिल (हिं.स.)। शहरातील वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर सायलेन्सर, कर्णकर्कश हार्न व साऊंड सिस्टीमसह एकूण 9.18 लाख रुपयांचे साहित्य जप्त करून त्याचा सार्वजनिकरित्या नाश करण्यात आला.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण व उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबविण्यात आली.शहरातील प्रमुख मार्ग, चौक व संवेदनशील भागांमध्ये वाहनांची तपासणी करून नियमबाह्य उपकरणांवर कारवाई करण्यात आली. विशेषतः युवकांकडून वापरले जाणारे “इंदुरी (फटाका) सायलेन्सर”, मॉडिफाईड मफलर, उच्च क्षमतेचे साऊंड बॉक्स, कर्णकर्कश हार्न, एलईडी लाईट्स व टेप रेकॉर्डर यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.या मोहिमेत एकूण 149 बेकायदेशीर सायलेन्सर, 19 साऊंड बॉक्स, 06 हार्न, 25 एलईडी लाईट्स व 13 टेप रेकॉर्डर असा ₹9,18,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संबंधित वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक व कायदेशीर कारवाई करण्यात आली.जप्त केलेले साहित्य पुन्हा वापरात येऊ नये म्हणून 07 एप्रिल रोजी नवीन रेणापूर नाका ते रेल्वे स्टेशन रोड दरम्यान एच.पी. पेट्रोल पंपासमोर रोड रोलरच्या सहाय्याने त्याचा नाश करण्यात आला. ही प्रक्रिया पोलीस, महानगरपालिका कर्मचारी, पंच व छायाचित्रकार यांच्या उपस्थितीत पार पडली.नष्ट केलेल्या साहित्याच्या स्क्रॅपमधून 16,560 रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली असून ती शासनाकडे जमा करण्यात येणार आहे.लातूर पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनांवर बेकायदेशीर सायलेन्सर, हार्न किंवा साऊंड सिस्टीम बसवू नयेत. ध्वनी प्रदूषण हे केवळ कायद्याचे उल्लंघन नसून सार्वजनिक आरोग्य व शांततेसाठी धोकादायक आहे. भविष्यातही अशा कारवाया अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis