
नांदेड, 07 एप्रिल, (हिं.स.)। नांदेड शहरात सुरू असलेल्या रक्तरंजित गैंगवारने पुन्हा एकदा थरकाप उडवला असून, शिवसेना कार्यकर्ते सोनू कल्याणकर यांची निर्घृण हत्या करण्यात आली. सलग घडलेली ही पाचवी खुनाची घटना असून, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे चित्र समोर येत आहे. श्रीनगर रस्त्यावरील पंचशील कापड दुकानाजवळ असलेल्या कुमार ड्रेसेस समोर ही थरारक घटना घडली. अचानक एका अज्ञात चारचाकी वाहनातून सहा ते सात हल्लेखोर बाहेर पडले. त्यांच्या हातात तलवारी, लोखंडी रॉड आणि धारदार शस्त्रे होती. त्यांनी कोणतीही उसंत न देता सोनू
कल्याणकर यांच्यावर झडप घालत बेदम वार केले. मानेवर, पाठीवर आणि संपूर्ण शरीरावर सपासप वार करत त्यांच्या शरीराची अक्षरशः चाळण करण्यात आली. हा हल्ला इतका भीषण होता की, सोनू कल्याणकर यांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून तात्काळ पलायन केले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोनू कल्याणकर यांनी काही वर्षांपूर्वी भाजयुमो अध्यक्षपदाची जबाबदारीही सांभाळली होती.
तीन वर्षांपूर्वी त्यांच्यावर वैयक्तिक वादातून हल्ला झाला होता, मात्र तेव्हा ते बचावले होते. आज मात्र त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधीही मिळाली नाही.
शहरातील श्रीनगर परिसरात घडलेल्या सोनू कल्याणकर खून प्रकरणाचा नांदेड पोलिसांनी काही तासांतच उलगडा करत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात कटरने निर्दयीपणे खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलीस तपासानुसार, या खुनामागे जुन्या वादातून सूडाची भावना कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis