
वॉशिंग्टन , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका–इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा कूटनीतिक तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. दरम्यान, इराणनेही काही अटींसह अमेरिकेसोबत चर्चेला सहमती दर्शवली आहे.
युद्धविरामाची घोषणा करताना ट्रम्प म्हणाले, “पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्यासोबत झालेल्या चर्चेच्या आधारे इराणविरुद्ध होणारे विनाशकारी हल्ले थांबवण्यात आले आहेत. इराणने होर्मुज सामुद्रधुनी तात्काळ, पूर्णपणे आणि सुरक्षितपणे खुली करण्यास सहमती दर्शवली, तर मी दोन आठवड्यांच्या युद्धविरामास तयार आहे.”
ट्रम्प पुढे म्हणाले, “अमेरिका आणि इराण यांच्यातील पूर्वीच्या वादांतील जवळपास सर्व मुद्द्यांवर सहमती झाली आहे. मात्र, पुढील दोन आठवड्यांचा कालावधी कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आणि पश्चिम आशियातील देशांचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो की, ही दीर्घकालीन समस्या आता समाधानाच्या जवळ पोहोचली आहे.”
इराणचे परराष्ट्रमंत्री सैयद अब्बास अराघची यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत युद्धविरामाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अमेरिकेच्या विनंतीनुसार इराणने करार प्रस्ताव स्वीकारला आहे. इराणविरुद्धचे हल्ले थांबवले गेले, तर आमची सेना संरक्षणात्मक कारवाया बंद करेल. दोन आठवड्यांच्या कालावधीत, सशस्त्र दलांशी समन्वय साधून आणि तांत्रिक मर्यादा लक्षात घेऊन होर्मुज सामुद्रधुनीतून सुरक्षित वाहतूक सुनिश्चित केली जाईल.”
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही अमेरिकेकडून जाहीर करण्यात आलेल्या युद्धविरामाला समर्थन दिले. ते म्हणाले, “इराणने तात्काळ सामुद्रधुनी खुली केली आणि अमेरिका, इस्रायल तसेच प्रादेशिक देशांवरील सर्व हल्ले थांबवले, तर ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी हल्ले स्थगित करण्याच्या निर्णयाला इस्रायलचा पाठिंबा आहे.”
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले, “इराण आणि अमेरिका तसेच त्यांच्या सहयोगी देशांनी — लेबनॉनसह इतर प्रदेशांमध्ये — तात्काळ युद्धविरामावर सहमती दर्शवली आहे. या दूरदर्शी निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. दोन्ही देशांच्या नेतृत्वाचे आभार मानतो. तसेच, १० एप्रिल २०२६ रोजी इस्लामाबाद येथे निर्णायक करारासाठी पुढील चर्चेसाठी प्रतिनिधीमंडळांना आमंत्रित करतो.”
ऑस्ट्रेलियन सरकारने अमेरिका–इराण युद्धविराम कराराचे स्वागत करत, प्रादेशिक तणाव कमी करण्यासाठी आणि कायमस्वरूपी तोडगा शोधण्यासाठी हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि परराष्ट्रमंत्री पेनी वोंग यांनी संयुक्त निवेदनात सांगितले की, ऑस्ट्रेलिया दीर्घकाळापासून संघर्ष समाप्त करण्याचे आणि तणाव कमी करण्याचे आवाहन करत होता. त्यांनी स्पष्ट केले की युद्ध जितके लांबेल, तितका त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल आणि मानवी हानीही वाढेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode