सीजफायर लागू मात्र युद्ध अजून संपलेले नाही, युद्धविरामानंतरही इराणचा इशारा
तेहरान , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर तणाव काहीसा कमी झाला असला, तरी धोका अद्याप टळलेला नाही. इराणने आपल्या सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र ही युद्धाची समाप्ती नसल्य
सीजफायर लागू मात्र युद्ध अजून संपलेले नाही, युद्धविरामानंतरही इराणचा इशारा


तेहरान , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर तणाव काहीसा कमी झाला असला, तरी धोका अद्याप टळलेला नाही. इराणने आपल्या सैन्याला गोळीबार थांबवण्याचे आदेश दिले आहेत, मात्र ही युद्धाची समाप्ती नसल्याचेही स्पष्ट केले आहे. शत्रूने कोणतीही चूक केली तर पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही इराणने दिला आहे.

इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांनी सर्व लष्करी युनिट्सना युद्धविरामाचे पालन करत गोळीबार थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. हे विधान सरकारी प्रसारण माध्यमातून जारी करण्यात आले. त्यांनी सांगितले की, हा युद्धाचा शेवट नाही, परंतु सर्व सैन्यदलांनी आदेशांचे पालन करून गोळीबार थांबवावा. युद्धविरामाच्या घोषणेनंतर इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेनेही कठोर भूमिका मांडली. युद्धविराम म्हणजे युद्ध संपले असे नाही, असे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. इराणचे सैन्य पूर्णपणे सतर्क असून गरज पडल्यास तात्काळ प्रत्युत्तर दिले जाईल, असेही सांगण्यात आले. अमेरिका किंवा इस्रायलने कोणतीही आक्रमक कारवाई केल्यास त्याला पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला.

दरम्यान, अमेरिकेने यापूर्वी १५ मुद्द्यांचा प्रस्ताव दिला होता, त्याला उत्तर म्हणून इराणने १० मुद्द्यांचा प्रस्ताव मांडला असून तोच आता चर्चेचा आधार बनला आहे. या अटींमध्ये होर्मुज सामुद्रधुनीतील नियंत्रित जहाजवाहतूक, प्रदेशातून अमेरिकन सैन्याची माघार, इराणवरील सर्व निर्बंध हटवणे आणि परदेशात अडकलेली मालमत्ता परत देणे यांचा समावेश आहे.याशिवाय, युद्धात झालेल्या नुकसानीची भरपाई आणि या सर्व अटींना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाच्या स्वरूपात मंजुरी देण्याची मागणीही इराणने केली आहे.

अमेरिकेसोबतची चर्चा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे १० एप्रिलपासून सुरू होणार असल्याची पुष्टी इराणने केली आहे. ही चर्चा दोन आठवडे चालणार असून गरज पडल्यास ती पुढे वाढवली जाऊ शकते. इराणने आपल्या नागरिकांना एकजूट राहण्याचे आवाहन करत या युद्धविरामाला संभाव्य ऐतिहासिक विजयाकडे टाकलेले एक पाऊल असे म्हटले आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या युद्धविरामाला मोठे यश म्हटले आहे. अमेरिकेने आपली लष्करी उद्दिष्टे मोठ्या प्रमाणात साध्य केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इराणचा १० मुद्द्यांचा प्रस्ताव चर्चेसाठी चांगला आधार असून त्यातून कायमस्वरूपी शांततेचा मार्ग निघू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. मात्र, इराणने होर्मुज सामुद्रधुनी तात्काळ, पूर्णपणे आणि सुरक्षितपणे खुली करण्यास सहमती दिल्यासच युद्धविराम कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या संघर्षाची सुरुवात २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्याने झाली होती. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला होता. सुमारे ३९ दिवस चाललेल्या या युद्धात अनेक देशांमध्ये जीवितहानी झाली असून परिस्थिती अत्यंत गंभीर राहिली. इराणने आपल्या नागरिकांच्या बलिदानाचे कौतुक करत सांगितले की, या युद्धात त्यांनी बहुतेक उद्दिष्टे साध्य केली असून शत्रूला कमकुवत केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande