अमरावती : डिझेल घोटाळ्यानंतर आता मजुरी घोटाळा
अमरावती, 09 एप्रिल (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषद अंतर्गत कचरा संकलनाच्या कामात पुन्हा एकदा गंभीर अनियमिततेचा मुद्दा समोर आला असून, कंत्राटदारांकडून मजुरांच्या मजुरीत मोठ्या प्रमाणात कपात केली जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. याप्रकरणी थेट
अमरावती : डिझेल घोटाळ्यानंतर आता मजुरी घोटाळा


अमरावती, 09 एप्रिल (हिं.स.) : अंजनगाव सुर्जी नगरपरिषद अंतर्गत कचरा संकलनाच्या कामात पुन्हा एकदा गंभीर अनियमिततेचा मुद्दा समोर आला असून, कंत्राटदारांकडून मजुरांच्या मजुरीत मोठ्या प्रमाणात कपात केली जात असल्याचा आरोप मजुरांनी केला आहे. याप्रकरणी थेट मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

मजुरांच्या म्हणण्यानुसार, कचरा संकलनाच्या कामासाठी नियुक्त कंत्राटदाराने शासनाने मंजूर केलेल्या दरानुसार मजुरी न देता मोठ्या प्रमाणावर कपात केली आहे. कंत्राट घेताना मजुरांना दिवसाकाठी ५१९ रुपये मजुरी देण्याचे मान्य करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात मजुरांना केवळ ३०० रुपयेच दिले जात असल्याचा गंभीर आरोप तक्रारदार अब्दुल सादिक यांनी केला आहे. त्यामुळे प्रत्येक मजुरामागे दररोज सुमारे २१९ रुपयांची कपात होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

नगरपरिषद हद्दीत दररोज अंदाजे ८० मजूर कचरा संकलनाच्या कामात कार्यरत असल्याचे सांगितले जात आहे. या हिशोबाने दररोज सुमारे १६ हजार रुपयांची मजुरी कंत्राटदाराकडून रोखली जात असल्याचा आरोप असून, हा प्रकार महिन्याला लाखोंच्या घरात जात असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित कंत्राटदाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

विशेष म्हणजे, याच कंत्राटदाराविरोधात मागील वर्षी देखील शासकीय डिझेल-पेट्रोल बिलांमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप झाला होता. त्या वेळी बिलांमध्ये फेरफार करून जादा रक्कम उचलल्याचा मुद्दा पुढे आला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर प्रहार संघटनेने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार चौकशीही करण्यात आली होती. मात्र, वर्षभराच्या आतच पुन्हा एकदा त्याच कंत्राटदारावर गंभीर आरोप झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.-----------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande