
गंगटोक, ९ एप्रिल (हिं.स.) : भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने उत्तर सिक्कीममधील लाचेन येथे अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेसाठी 'ऑपरेशन हिम सेतू' सुरू केले आहे. भूस्खलनामुळे उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि चुंगथांग दरम्यानचा रस्ता संपर्क विस्कळीत झाला असून, त्यामुळे परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. या परिस्थितीला प्रतिसाद म्हणून, भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडच्या अंतर्गत असलेल्या त्रिशक्ती कॉर्प्सने, संपर्क पुन्हा प्रस्थापित करणे आणि अडकलेल्या पर्यटकांची सुटका करणे या उद्देशाने 'ऑपरेशन हिम सेतू' तातडीने सुरू केले.
खराब हवामान आणि मुसळधार बर्फवृष्टी असूनही, जवानांनी बचाव कार्यासाठी महत्त्वाचे मार्ग खुले केले आहेत आणि पर्यायी मार्गही कार्यान्वित केले आहेत. सीमा रस्ते संघटना (बीआरओ), त्रिशक्ती कॉर्प्सच्या जवानांच्या समन्वयाने, कठीण हवामान आणि भूभागात सातत्याने रस्ते मोकळे करत आहे, बर्फ हटवत आहे आणि रस्त्यांची जोडणी पूर्ववत करत आहे. बचावकार्य टप्प्याटप्प्याने केले जात आहे. आतापर्यंत १३५ पर्यटकांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून, ३२ हलकी वाहने आणि १० मोटारसायकलींनाही बाहेर काढण्यात आले आहे.भारतीय लष्कर, नागरी प्रशासनाच्या समन्वयाने, परिस्थितीनुसार घटनास्थळी सक्रियपणे मदत, आरोग्यसेवा आणि स्थलांतरण पुरवत आहे. सध्या, लाचेनमध्ये अंदाजे १,००० पर्यटक असून, त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरू आहेत.
एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले, प्रत्येक नागरिकाची सुरक्षा आणि कल्याण ही आमची पहिली प्राथमिकता आहे. आमचे पथक घटनास्थळी सर्व आवश्यक मदत पुरवण्यासाठी कटिबद्ध आहे. कठीण आणि बर्फाच्छादित उंच मार्गांवरून नागरी वाहने ओढण्यासाठी लष्करी वाहनांचा वापर करण्यात आला आहे. आरोग्यविषयक आणीबाणीच्या परिस्थितीत, तसेच मदतीची गरज असलेल्या नागरिकांना प्राधान्याने बाहेर काढण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे