
अहिल्यानगर, 09 एप्रिल (हिं.स.) - राहुरी विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, हे स्पष्ट झालं आहे. एकूण ७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यात मुख्य लढत होईल. या दोन पक्षांव्यतिरिक्त आणखी पाच उमेदवार ही निवडणूक लढत आहेत.
राहुरीची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल, अशी चर्चा होती. पण राजकीय घडामोडी घडल्या आणि ही निवडणूक चुरशीची होईल हे स्पष्ट झाले आहे. या पोटनिवडणुकीसाठी ३० जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस होता. २३ जणांनी माघार घेतली. तर प्रमुख पक्षांच्या दोन उमेदवारांसह एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. भाजपकडून अक्षय शिवाजी कर्डिले विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद मोकाटे यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे संतोष एकनाथ चोळके, तसेच महेश केशव हापसे, सुरेश दत्तात्रय लांबे आणि अथर्व साहेबराव म्हसे हे इतर अपक्ष उमेदवारही निवडणुकीत नशीब आजमावत आहेत. दरम्यान शिवसेना (उबाठा) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवत बंडखोरीचा झेंडा उंचावला आहे.
माघारीनंतरचे चित्र स्पष्ट झाल्याने आता राहुरीत कोण बाजी मारणार याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी