खरेदी-विक्री संघाच्या सभेत राडा, वैजापूरमध्ये एकमेकांची कॉलर पकडत सदस्य भिडले
छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)। जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी आयोजित वैजापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या विशेष सभेत गोंधळ उडाला. प्रतिनिधी निवडीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर
खरेदी-विक्री संघाच्या सभेत राडा, वैजापूरमध्ये एकमेकांची कॉलर पकडत सदस्य भिडले


छत्रपती संभाजीनगर, 09 एप्रिल (हिं.स.)।

जिल्हा बँक निवडणुकीसाठी प्रतिनिधी निवडण्यासाठी आयोजित वैजापूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाच्या विशेष सभेत गोंधळ उडाला. प्रतिनिधी निवडीच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजप सदस्यांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी एकमेकांची कॉलर पकडण्यापर्यंत मजल गेल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

सभेच्या सुरवातीला वातावरण शांत होते, मात्र प्रतिनिधी निवडीचा विषय निघताच शिवसेना व भाजप सदस्यांमध्ये तीव्र खडाजंगी झाली. वैजापूर खरेदी-विक्री संघाच्या सभेत प्रतिनिधी निवडीवरून एकमेकांची गचांडी पकडली. समर्थकांनी सभेचे इतिवृत्त पळवून नेले. मर्जीतील सभासदांनाच बोलावल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घातल्याने प्रशासक ओंकार देवापुरे यांनी कोरमअभावी सभा तहकूब केली. दरम्यान, अर्ध्या तासानंतर पुन्हा सभा सुरू झाली. यावेळी उपस्थित सभासदांनी साहेबराव औताडे यांची जिल्हा बँक प्रतिनिधी म्हणून सर्वानुमते निवड केली. निवडीचे नवे इतिवृत्त तयार करून सहायक निबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी प्रशांत घाणेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी संजय निकम, श्रीराम गायकवाड, भागीनाथ मगर, राजेंद्र साळुंके यांच्यासह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande