
बीड, 09 एप्रिल, (हिं.स.)। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त माजलगाव शहरात शनिवार, दि.११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सत्यशोधक विचारांची प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमात समाज प्रबोधनकार डॉ. रामपाल महाराज धारकर यांचे व्याख्यान होणार असून भारताच्या संविधानाचेही वाटप करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अजय शिंदे यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी युवा नेते दत्ता विसवळे राहणार आहेत. तसेच बाबुराव पोटभरे, माधव निर्मळ, ज्ञानेश्वर मेंडके, तुकाराम येवले, डॉ. अशोक तिडके यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. सामाजिक जागृती आणि समतेचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजक विलास नेमाने, किशोर पांचाळ यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis