
अमरावती, ०९ एप्रिल (हिं.स.) : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी यंदाची उन्हाळी सुटी २ मेपासून लागू होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात २६ जूनऐवजी १५ जूनपासून करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळा उशिरा सुरू करण्याची आतापर्यंतची पद्धत यंदा रद्द करण्यात आली आहे.
राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून अधिकृत सुटी जाहीर करण्यात आली आहे. तसेच, २८ मार्च रोजी शिक्षण संचालनालयाने काढलेल्या आदेशानुसार सर्व शाळांना एकसमान वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे.
दरवर्षी विदर्भातील तीव्र उष्णतेमुळे शाळा २६ किंवा २७ जूनपासून सुरू करण्याची पद्धत होती. मात्र, यंदा हा अपवाद रद्द करून १५ जूनपासूनच शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षक संघटनांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उष्णतेचा विचार करून १५ ते २७ जूनदरम्यान शाळा सकाळी ७ ते ११.४५ या वेळेत भरवण्यात येणार आहेत. त्यानंतर ३० जूनपासून नियमित वेळापत्रक लागू होईल.
दरम्यान, इतर मंडळांच्या शाळांना स्थानिक परिस्थितीनुसार सुटी जाहीर करण्याचा अधिकार देण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून संबंधित प्रशासनाने निर्णय घ्यावा, असे परिपत्रकात नमूद आहे.
शिक्षक संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला असून, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आधीच्या निर्देशांचा भंग झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विदर्भातील शाळा २६ जूननंतरच सुरू व्हाव्यात, अशी मागणीही संघटनांकडून करण्यात येत आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी