
-आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ माहिती पुरवली जाणार
नवी दिल्ली, २ मे (हिं.स.)केंद्र सरकारने आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना जलद आणि प्रभावी माहिती देण्यासाठी 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टीम' सुरू केली आहे. संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या उपस्थितीत सुरू करण्यात आलेल्या या अत्याधुनिक प्रणालीची शनिवारी देशभरात यशस्वी चाचणी घेण्यात आली.
चाचणीदरम्यान, सकाळी अंदाजे ११:४५ वाजता, देशभरातील मोबाईल फोनवर एकाच वेळी बीप आवाजासह आपत्कालीन सूचना संदेश प्राप्त झाला. या संदेशात स्पष्टपणे नमूद केले होते की ही केवळ एक चाचणी असून नागरिकांनी कोणतीही कृती करण्याची आवश्यकता नाही. आपत्तीच्या काळात माहितीच्या प्रसाराची तत्परता आणि परिणामकारकता तपासणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
ही प्रणाली संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (NDMA) सहकार्याने विकसित केली आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांपर्यंत महत्त्वपूर्ण माहिती वेळेवर पोहोचेल. दूरसंचार विभागाचे प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या 'सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स' (C-DOT) ने विकसित केलेली 'सचेत' ही एकात्मिक सूचना प्रणाली देखील NDMA ने यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे.
ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या 'कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल' (CAP) वर आधारित आहे आणि सध्या देशातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. ही प्रणाली भौगोलिकदृष्ट्या लक्ष्यित क्षेत्रांमधील मोबाईल वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन सूचना पाठवते.
सरकारी आकडेवारीनुसार, नैसर्गिक आपत्ती, हवामानाचे इशारे आणि चक्रीवादळांच्या वेळी या प्रणालीअंतर्गत आतापर्यंत १९ हून अधिक भारतीय भाषांमध्ये १३४ अब्जाहून अधिक एसएमएस सूचना पाठवण्यात आल्या आहेत.
आपत्ती सूचना प्रणालीला अधिक मजबूत करण्यासाठी, आता एसएमएसमध्ये 'सेल ब्रॉडकास्ट' तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे. हे तंत्रज्ञान एका विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांवर एकाच वेळी सूचना पाठवण्याची सुविधा देते, ज्यामुळे जवळपास रिअल-टाइममध्ये माहिती पोहोचवणे शक्य होते.
त्सुनामी, भूकंप, वीज कोसळणे, गॅस गळती आणि इतर रासायनिक धोके यांसारख्या अत्यंत संवेदनशील परिस्थितीत ही प्रणाली विशेषतः प्रभावी ठरेल. ही स्वदेशी सार्वजनिक आपत्कालीन सूचना प्रणाली विकसित करण्याची आणि कार्यान्वित करण्याची जबाबदारी सी-डॉट (C-DOT) कडे सोपवण्यात आली आहे.
या प्रारंभ सरावाचा एक भाग म्हणून, दिल्ली-एनसीआरसह देशभरातील राजधानीच्या शहरांमधील मोबाईल वापरकर्त्यांना हिंदी, इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये चाचणी संदेश पाठवण्यात आले. त्या संदेशात म्हटले होते, भारत स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या नागरिकांसाठी जलद आपत्ती सूचना सेवेकरिता 'सेल ब्रॉडकास्ट' सुरू करत आहे. सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र. हा संदेश मिळाल्यावर कोणतीही कारवाई अपेक्षित नाही. हा एक चाचणी संदेश आहे.
सरकारने या उपक्रमाचे वर्णन सतर्क नागरिक, सुरक्षित राष्ट्र या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असे केले आहे. नागरिकांना अशा चाचणी संदेशांमुळे घाबरून न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण त्यांचा उद्देश केवळ आपत्कालीन माहिती प्रणाली अधिक मजबूत आणि प्रभावी करणे हा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे