
नाशिक, 02 मे (हिं.स.)।
येथील बहुराष्ट्रीय नामांकित टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण व धर्मांतराचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिकरोड सत्र न्यायालयाने फेटाळून लावल्याने तिच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान, निदा खान हिने मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिकरोड सत्र न्यायालयाचे न्या. केदार जोशी यांनी गुन्ह्यातील गांभीर्य लक्षात घेत दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर राखून ठेवलेला निकाल शनिवारी (दि. २) जाहीर केला. त्यानुसार अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करण्यात आला.टीसीएस कंपनीतील पीडित महिलेच्या तक्रारीवरून देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात बलात्कार, धर्मांतराचा प्रयत्न आणि ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांना अटक करण्यात आली असून ते सध्या मुंबई नाका पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात एसआयटीच्या ताब्यात आहेत.तर मुख्य संशयित निदा खान गेल्या महिनाभरापासून पसार असून ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही.
सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी युक्तिवाद करताना निदा खान हिचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे असल्याचे सांगितले. तिच्या चौकशीशिवाय तपास पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे अटक आवश्यक असल्याचे त्यांनी न्यायालयात मांडले.
तर बचाव पक्षाचे वकील राहुल कासलीवाल यांनी महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा नसल्याचा युक्तिवाद करत तसेच संशयित गरोदर असल्याने तिच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अटकपूर्व जामीन मंजूर करण्याची मागणी केली होती. या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) करत असून, दानिश शेखचा मोबाइल व लॅपटॉप जप्त करून त्यातील माहिती व पासवर्ड उघडण्यात आले आहेत. त्यातून महत्त्वाचे पुरावे मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.दरम्यान, या प्रकरणात अटक करण्यात आलेले तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसेन शौकत कुरेशी आणि रझा रफीक मेमन या चौघांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने ४ मेपर्यंत वाढ केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV