मे महिन्यातील उष्णतेच्या स्थितीमुळे घाबरण्याचे कारण नाही - डॉ. जितेंद्र सिंह
नवी दिल्ली, 02 मे (हिं.स.)। मे महिन्यासाठी वर्तवण्यात आलेल्या किंवा अपेक्षित असलेल्या उष्णतेच्या स्थितीबाबत सामान्य नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ.
No need panic over the heat conditions May  Dr. Jitendra Singh


नवी दिल्ली, 02 मे (हिं.स.)। मे महिन्यासाठी वर्तवण्यात आलेल्या किंवा अपेक्षित असलेल्या उष्णतेच्या स्थितीबाबत सामान्य नागरिकांनी घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नसल्याचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. यासंदर्भात व्यक्त केलेल्या अंदाजाचे योग्य आकलन करून तसेच दैनंदिन जीवनातील साध्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले तर कोणतेही अनावश्यक दुष्परिणाम टाळता येतील असे त्यांनी म्हटले आहे.

डॉ. जितेंद्र सिंह यांनी आपल्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, संपूर्ण देशभर अशी एकसमान स्थिती असणार नाही, तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाने वेळोवेळी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून, त्याबाबतीत सज्ज राहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या परिस्थितीबद्दल अवास्तव भीती बाळगू नये असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने जारी केलेल्या ताज्या मासिक अहवालाचा आणि हवामान विषयक श्रेणीबद्ध विस्तारित अंदाजाचा संदर्भही त्यांनी या संवादात मांडला. यानुसार दक्षिण द्वीपकल्पीय भारत तसेच ईशान्य आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मे महिन्याच्या काळात देशाच्या भूभागापैकी मोठ्या क्षेत्रातले तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच अनेक भागांमधले किमान तापमान देखील सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

हिमालयाच्या पायथ्याशी, ओदिशासह पूर्व किनारपट्टीलगतचा काही भूभाग, आंध्र प्रदेशाचा किनारपट्टीलगतचा भूभाग आणि त्याच्याशी संलग्न तामिळनाडू, तसेच गुजरात आणि महाराष्ट्र या क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची स्थिती असण्याची अपेक्षा असल्याची माहिती त्यांनी दिली. या क्षेत्रांमध्ये सामान्यपणे उष्णतेच्या लाट असण्याच्या सरासरी कालवधीच्या तुलनेत 2 ते 4 दिवसांनी वाढ होऊ शकते, अशी माहिती त्यांनी दिली.

या श्रेणीबद्ध विस्तारित अंदाजानुसार, मे महिन्याच्या दुसऱ्या (8 ते 14 मे) आणि चौथ्या (22 ते 28 मे) आठवड्यात तापमान तुलनेने जास्त असण्याची अपेक्षा आहे. यामुळे भारताच्या वायव्य, मध्य आणि पश्चिम भागातील काही भूभागांसह पूर्व किनारपट्टीवर उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होऊ शकते, असे डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले. मे महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या आठवड्यात (1 ते 7 मे आणि 15 ते 21 मे), पाऊस आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स तसेच मेघगर्जनेसह होणाऱ्या पावसामुळे देशाच्या बहुतांश भागात तापमान सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी राहील अशी शक्यताही त्यांनी बोलून दाखवली. ठराविक कालावधीत रात्रीच्या वेळी वाढलेल्या तापमानामुळे, विशेषतः शहरी आणि किनारपट्टीच्या भागांमध्ये उष्णतेचा त्रास वाढू शकतो. पूर्व किनारपट्टी, गुजरात आणि महाराष्ट्रातही उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता आहे, असे मंत्र्यांनी सांगितले.

जागतिक हवामान परिस्थितीबद्दल बोलताना ते म्हणाले की, सध्या ENSO-न्युट्रल (एल निनो–सदर्न ऑसिलेशन (ENSO) चक्रातील सामान्य अवस्था, ज्यात उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्रपृष्ठाचे तापमान सरासरीच्या जवळ असते) परिस्थिती आहे आणि नैऋत्य मान्सून हंगामात एल निनोची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

उष्णतेशी संबंधित परिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकार पूर्णपणे तयार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, कार्यरत शीतकरण व्यवस्था आणि अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर समन्वित प्रयत्नांवर त्यांनी भर दिला. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणारे कामगार अशा संवेदनशील गटांवर विशेष लक्ष दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

उत्तर आणि वायव्य भागांमध्ये रब्बी पिकांच्या काढणीसाठी सध्याची परिस्थिती सर्वसाधारणपणे अनुकूल आहे, मंत्र्यांनी कृषी क्षेत्राबाबत बोलताना सांगितले. मात्र, दक्षिण आणि ईशान्य भारतातील काही भागांमध्ये स्थानिक उष्णतेच्या ताणामुळे भात (बोरो), मका आणि कडधान्ये यांसारख्या काही उन्हाळी पिकांवर परिणाम होऊ शकतो, असेही ते म्हणाले. शेतकऱ्यांना सकाळ आणि संध्याकाळच्या वेळी शेतीची कामे करण्याचा, हलक्या आणि वारंवार सिंचन सुनिश्चित करण्याच्या तसेच पशुधनासाठी संरक्षणात्मक उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सार्वजनिक सूचना देताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचे, दुपारच्या तीव्र उन्हाच्या वेळी जास्त वेळ बाहेर न राहण्याचे आणि आपल्या सभोवतालच्या संवेदनशील व्यक्तींच्या गरजांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. भारतीय हवामान विभागाच्या दैनंदिन अद्ययावत माहितीचे आणि परिणामांवर आधारित हवामान अंदाजांचे पालन केल्यास आरोग्याला होणारे संभाव्य धोके कमी करण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

अलिकडच्या वर्षांत भारताच्या हवामान अंदाज क्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली आहे, ज्यामुळे अधिक अचूक आणि वेळेवर सूचना प्रसारित करणे शक्य झाले आहे, जे प्रभावी प्रतिसाद आणि सार्वजनिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहे, असे त्यांनी नमूद केले.

अद्ययावत हवामान माहिती भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.mausam.imd.gov.in), 'मौसम ऍप' आणि 'मौसमग्राम' पोर्टलसह विविध मोबाइल ॲप्लिकेशन्सवर आणि माध्यमांवर उपलब्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande