
नवी दिल्ली, 02 मे (हिं.स.)केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (सीबीआय) एका मोठ्या बँकिंग आणि आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात महत्त्वपूर्ण यश मिळवले आहे. बराच काळ फरार असलेला आरोपी कमलेश पारेखचे संयुक्त अरब अमिरातीमधून (युएई) भारतात प्रत्यार्पण करण्यात आले आहे. पारेखला १ मे रोजी भारतात आणण्यात आले, जिथे दिल्लीत पोहोचल्यावर सीबीआयने त्याला ताब्यात घेतले.
परराष्ट्र मंत्रालय आणि गृह मंत्रालयाच्या समन्वयाने ही कारवाई करण्यात आली. पारेखविरुद्ध जारी केलेल्या इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटीसच्या आधारे, युएईमध्ये त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले. भारताच्या औपचारिक विनंतीनंतर आणि दोन्ही देशांमधील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला भारतीय तपास यंत्रणांच्या स्वाधीन करण्यात आले.
तपास यंत्रणांनुसार, कमलेश पारेखवर मोठ्या प्रमाणावर बँकिंग आणि आर्थिक फसवणुकीचा आरोप आहे. या घोटाळ्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नेतृत्वाखालील देशातील बँकांच्या समूहाला मोठे नुकसान झाले. या प्रकरणात शेकडो कोटी रुपयांचा अपहार झाल्याचा अंदाज आहे.
सीबीआयच्या तपासात असे उघड झाले आहे की, पारेख यांनी इतर प्रवर्तक आणि संचालकांसोबत मिळून, परदेशात असलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून बँकेतून काढलेला निधी वळवला. हे फसव्या निर्यात व्यवहारांमधून, संशयास्पद आर्थिक व्यवहारांमधून आणि बँकिंग प्रणालीचा गैरवापर करून साध्य करण्यात आले.
आरोपीने संयुक्त अरब अमिरातीसह अनेक देशांमध्ये पसरलेल्या आपल्या व्यावसायिक नेटवर्कचा वापर करून ही फसवणूक केली. संपूर्ण नेटवर्क आणि इतर आरोपींची भूमिका उलगडण्यासाठी तपास यंत्रणा आता त्याची चौकशी करत आहेत.
सीबीआय, जी भारतात इंटरपोलसाठी राष्ट्रीय केंद्रीय ब्युरो म्हणून काम करते, ती भारतपोल प्लॅटफॉर्मद्वारे देशातील विविध कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांशी समन्वय साधते. या सहकार्यामुळे गेल्या काही वर्षांत इंटरपोलच्या माध्यमातून १५० हून अधिक पाहिजे असलेल्या गुन्हेगारांचे भारतात प्रत्यार्पण झाले आहे. ही ताजी कारवाई आंतरराष्ट्रीय स्तरावर कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांमधील मजबूत सहकार्याचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे