सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष २० ते २३ मे दरम्यान भारत दौऱ्यावर
नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस २० ते २३ मेदरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या समवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असणार आहे. यामध्ये सायप्रसचे परर
CYPRUS PRESIDENT INDIA VISIT


नवी दिल्ली, 20 मे (हिं.स.)। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्तोदौलिदेस २० ते २३ मेदरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्या समवेत उच्चस्तरीय शिष्टमंडळही असणार आहे. यामध्ये सायप्रसचे परराष्ट्र मंत्री डॉ. कॉन्स्टँटिनोस कोम्बोस, परिवहन, संचार आणि बांधकाम मंत्री अलेक्सिस वाफेएड्स, वरिष्ठ अधिकारी तसेच उद्योग-जगताचे प्रतिनिधी सहभागी असतील.

परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदौलिदेस यांचा विद्यमान पदावरील हा पहिलाच भारत दौरा असेल. पंतप्रधान मोदी यांनी गेल्या वर्षी १५-१६ जून रोजी सायप्रसचा दौरा केला होता. त्या दौऱ्यानंतर अवघ्या एका वर्षाच्या आत ही भेट होत आहे. दोन दशकांहून अधिक कालावधीनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांचा तो पहिलाच सायप्रस दौरा होता.

सायप्रस युरोपियन संघ परिषदेचे अध्यक्षपद भूषवत असताना हा दौरा होत असल्याने या भेटीचे महत्त्व अधिक वाढले आहे.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदौलिदेस व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, मोबिलिटी, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा क्षेत्रांतील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांसह बहुपक्षीय मंचांवरील सहकार्याशी संबंधित विषयांवरही विचारविनिमय करणार आहेत.

पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्षांच्या सन्मानार्थ दुपारच्या भोजनाचे आयोजन करणार आहेत. राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदौलिदेस राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. राष्ट्रपती मुर्मू त्यांच्या सन्मानार्थ राजकीय भोजन देणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हेही सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेणार आहेत. आपल्या भारत दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष ख्रिस्तोदौलिदेस मुंबई येथे आयोजित बिझनेस फोरममध्येही सहभागी होणार आहेत.

भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून घनिष्ठ आणि विश्वासार्ह संबंध आहेत. दोन्ही देश १० फेब्रुवारी २०२७ रोजी आपल्या राजनैतिक संबंधांच्या ६५ वर्षांचा उत्सव साजरा करणार आहेत. हा दौरा भारत-सायप्रस संबंधांमधील सकारात्मक गतीला पुढे नेणारा असून भारत-युरोपियन संघ सहकार्याच्या व्यापक संदर्भात भागीदारी अधिक दृढ करण्याच्या सामायिक बांधिलकीचे प्रतीक मानला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande