पुलवामा हल्ल्यातील आरोपी हमजा बुरहानची पीओकेमध्ये गोळ्या झाडून हत्या
नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.)।अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणातील मास्टरमाइंड मानला जाणारा हमजा बुरहान याची पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना मुजफ्फरा
पुलवामा हल्ल्यातील आरोपी हमजा बुरहानची पीओकेमध्ये     गोळ्या झाडून हत्या


नवी दिल्ली, 21 मे (हिं.स.)।अल-बद्र या दहशतवादी संघटनेचा कमांडर आणि पुलवामा दहशतवादी हल्ला प्रकरणातील मास्टरमाइंड मानला जाणारा हमजा बुरहान याची पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) अज्ञात बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. ही घटना मुजफ्फराबादमध्ये घडली. हमलावरांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला आणि गंभीर जखमी झालेल्या हमजाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

तो 2017 मध्ये उच्च शिक्षणासाठी पाकिस्तानला जात असल्याचे सांगून गेला होता. मात्र, नंतर तो अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला आणि काही काळातच कमांडर बनला. स्थानिक माध्यमांच्या अहवालानुसार, मुजफ्फराबादमधील एआयएसएस कॉलेजबाहेर हमजाची कार वाहतूक कोंडीत अडकली होती. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर अनेक गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी बुर्का परिधान केला होता.

अल-बद्रमध्ये सामील झाल्यानंतर हमजा पुन्हा काश्मीरमध्ये परतला होता. दक्षिण काश्मीरमधील तरुणांना कट्टरतावादाकडे वळवणे आणि त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्याचे काम तो करत असल्याचा आरोप त्याच्यावर होता. त्याचे नेटवर्क मुख्यतः दक्षिण काश्मीरमध्ये सक्रिय होते. भारत सरकारने 2022 मध्ये हमजा बुरहानला अधिकृतपणे दहशतवादी घोषित केले होते. अहवालांनुसार, पाकिस्तानमध्ये स्वतःची ओळख लपवण्यासाठी तो एका शाळेत प्राचार्य म्हणून काम करत होता. आपल्या सहकाऱ्यांमध्ये तो ‘डॉक्टर’ या नावाने ओळखला जात होता.

काश्मीरमध्ये वास्तव्यास असताना त्याने पुलवामापासून शोपियानपर्यंत आपले जाळे विस्तारले होते. त्याच्या मृत्यूला पाकिस्तानस्थित दहशतवादी नेटवर्कसाठी मोठा धक्का मानले जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सक्रिय पाकिस्तान-समर्थित दहशतवादी संघटनांसाठी काम करणाऱ्या प्रमुख व्यक्तींमध्ये त्याचा समावेश होता. हमजा हा ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी अबू दुजाना, अबू कासिम, बुरहान वानी आणि झाकीर मूसा यांचा निकटचा सहकारी होता.

अहवालांनुसार, हमजा बुरहानचे खरे नाव अर्जुमंद गुलजार डार होते.तो पुलवामातील रत्नीपोरा येथील रहिवासी होता.2017 मध्ये पाकिस्तानला जाऊन तो अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला.अल-बद्रला भारताने दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे.हमजा अल-बद्रचा कमांडर म्हणून कार्यरत होता. भारताच्या गृहमंत्रालयाने 2022 मध्ये त्याला दहशतवादी घोषित केले होते.

14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर सीआरपीएफच्या बसवर आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. एका दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यावर आदळवली होती. या भीषण हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. हा हल्ला देशातील सर्वात भीषण दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. स्फोटाचा आवाज मैलोनमैल दूरपर्यंत ऐकू आला होता आणि रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande