
नागपूर, 20 मे (हिं.स.) : देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या ‘नीट-यूजी 2026’ पेपरफुटी प्रकरणात आता नागपूर कनेक्शन समोर आले असून, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) तपासाची व्याप्ती वाढवली आहे. नांदेड आणि लातूर पॅटर्नचा तपास करताना ‘आलोक’ नावाचा संशयित मास्टरमाईंड सीबीआयच्या रडारवर आला असून, त्याच्यामार्फत महाराष्ट्रासह देशभरातील किमान 1000 विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका विकण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
लातूरच्या ‘आरसीसी’ क्लासेसचे संचालक प्रा. डॉ. शिवराज मोटेगावकर यांना अटक झाल्यानंतर या रॅकेटमध्ये नागपूरमधील काही दलालांची भूमिका समोर येऊ लागली आहे. यापूर्वी 2015 मधील एआयपीएमटी आणि 2021 मधील नीट घोटाळ्यांमध्येही नागपूरमधील रॅकेटची नावे समोर आली होती. त्यामुळे सीबीआयने आता या नव्या ‘आलोक रॅकेट’चा तपास अधिक वेगाने सुरू केला आहे.सीबीआयच्या मुंबई विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी यांनी नुकतीच नांदेडमध्ये कारवाई केली. चौकशीदरम्यान कदम कुटुंबीयांकडून आलोकचे नाव समोर आले. तपासात असे उघड झाले की, नांदेडमधील एका महिलेने आपल्या मुलीसाठी तब्बल पाच लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केला होता. त्यासाठी सुरुवातीला 25 हजार रुपये ऑनलाईन टोकन म्हणून देण्यात आले होते.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, संबंधित विद्यार्थिनीला आणि तिच्या कुटुंबीयांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी जवळपास 15 दिवस पुण्यातील एका गुप्त ठिकाणी ठेवण्यात आले होते. तिथेच तिला प्रश्नपत्रिका देऊन पूर्वतयारी करून घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासानुसार, अशाच पद्धतीने महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना पुण्यात बोलावून पेपर पुरविण्यात आला होता. एनटीएच्या पॅनेलवरील काही प्राध्यापकांच्या मदतीने प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा संशय असून, या प्रकरणात पुण्यातील रसायनशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र विषयाच्या काही प्राध्यापकांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, सीबीआयचे विशेष पथक नागपूर आणि चंद्रपूर परिसरातील संशयित विद्यार्थ्यांच्या घरांवर झडती घेत असून, ‘आलोक’चा शोध घेण्यासाठी नागपुरात तळ ठोकून आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून, स्पर्धा प्रवेश परीक्षांच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी