
रत्नागिरी, 21 मे (हिं.स.) । राजापूर शहरातील जलशुद्धीकरण केंद्राची अवस्था अत्यंत बिकट झाली असून, तातडीच्या दुरुस्तीसाठी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी नगरसेवक महेश शिवलकर यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे केली आहे.
श्री. शिवलकर यांनी आमदार सामंत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अनेक वर्षांपूर्वी बांधलेले जलशुद्धीकरण केंद्र सध्या कालबाह्य झाले आहे. फिल्ट्रेशन बेड कमकुवत झाल्याने शुद्ध पाणीपुरवठ्यात अडचणी येत आहेत. तसेच पंप, व्हॉल्व्ह आणि केमिकल डोसिंगची यंत्रे जुनी झाल्याने वारंवार बिघाड होत आहे. मुख्य जलवाहिन्या आणि टाक्यांमधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे.
पावसाळा जवळ आल्याने दूषित पाण्याचा पुरवठा झाल्यास शहरात आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी भीतीदेखील व्यक्त केली आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या अंदाजानुसार या संपूर्ण दुरुस्ती कामासाठी सुमारे ५० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.
आमदार स्थानिक विकास निधी किंवा नगरविकास विभागाच्या विशेष योजनेतून हा ५० लाखांचा निधी तातडीने मंजूर करावा, अशी विनंती श्री. शिवलकर यांनी केली आहे. नागरिकांना अखंडित, शुद्ध आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी जलशुद्धीकरण केंद्राचे आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्यास नागरिकांची मोठी गैरसोय होईल, त्यामुळे तातडीने निधी मंजूर करण्याची विनंती त्यांनी करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी