
लातूर, 21 मे (हिं.स.)।
महानगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि हलगर्जीपणामुळे एका निष्पाप २२ वर्षीय तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. भटक्या कुत्र्याने चावल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी आणि स्थानिक नागरिकांनी मृतदेह थेट महानगरपालिकेच्या आवारात आणून प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
लातूर शहरातील एका २२ वर्षीय तरुणाला काही दिवसांपूर्वी भटक्या कुत्र्याने चावले होते. यानंतर त्याची प्रकृती खालावत गेली. गेल्या तीन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता. मात्र, अखेर उपचारादरम्यान या तरुण युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एका तरुण मुलाचा असा अचानक बळी गेल्याने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, लातूर शहरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट प्रचंड वाढला आहे. याबाबत नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाला वारंवार लेखी निवेदने दिली
होती आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने या निवेदनांकडे साफ दुर्लक्ष केले. जर वेळेत महापालिकेने पावले उचलली असती, तर आज या २२ वर्षांच्या तरुणाचा जीव वाचला असता, असा संतप्त आरोप नागरिकांनी केला आहे.
मोर्चा तरुणाच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी आणि महिलांनी लातूर शहर महानगरपालिकेवर काढला. संतापाची सीमा ओलांडलेल्या नागरिकांनी थेट मृतदेह (डेड बॉडी) महापालिकेच्या पायऱ्यांवर आणून ठेवला आणि जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
आंदोलनाचा वाढता जोर पाहून महापालिका प्रशासनाने मुख्य गेटला कुलूप ठोकले. यामुळे आंदोलनकर्ते अधिकच भडकले. संतप्त झालेल्या महिलांनी थेट हातामध्ये दगड घेऊन महापालिकेच्या गेटचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. महापालिका आवारात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई आणि पीडित कुटुंबाला न्यायाची मागणी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis