घोषणांचा सुकाळ, कामांचा दुष्काळ; दानवेंचा छ. संभाजीनगर महापालिकेवर घणाघात
छत्रपती संभाजीनगर, 21 मे, (हिं.स.)। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. महापालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजावर बोलताना दानवे यांनी ''घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच
घोषणांचा सुकाळ, कामांचा दुष्काळ; दानवेंचा छ. संभाजीनगर महापालिकेवर घणाघात


छत्रपती संभाजीनगर, 21 मे, (हिं.स.)। शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कारभारावर टीका केली आहे. महापालिकेच्या 100 दिवसांच्या कामकाजावर बोलताना दानवे यांनी 'घोषणांचा सुकाळ आणि कामांचा दुष्काळ यापलीकडे शहराच्या पदरात काहीच पडलेले नाही', अशा शब्दात प्रहार केला आहे. तसेच मनपा गटनेते गणेश लोखंडे यांनीही कामकाजावर ताशेरे ओढले आहेत.

सत्ताधाऱ्यांच्या अपयशाची आणि खोटेपणाची ही तिखट उदाहरणे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी काही मुद्यांवर लक्ष वेधले आहे. हेरिटेज वॉकचा सपशेल खोटा दावा: महापालिकेने स्वतः 'हेरिटेज वॉक' सुरू केल्याचे सांगतात. मात्र हे वॉक सुमारे दहा वर्षांपासून शहरात सुरू आहेत.

अंबादास दानवे म्हणाले, पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करण्याचे आश्वासन हवेतच विरले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक निर्देशानंतरही नागरिकांना हक्काचे पाणी मिळेना. 5-6 दिवसांऐवजी आता थेट महिन्यातून अवघे 3 (120 मिनिटे सारासरी) वेळा पाणी मिळत असल्याने संपूर्ण शहर पाण्यासाठी वणवण भटकत आहे, असे अंबादास दानवे म्हणाले.

आरोग्याविषयी बोलताना अंबादास दानवे म्हणाले, पडेगाव कचरा डेपोला लागलेली आग आणि धुराच्या विळख्यामुळे परिसरातील नागरिकांचे, लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लोकांना आपली घरे विकण्याची वेळ आली आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि निष्क्रीय महापौर सुस्त बसून आहेत.

अंबादास दानवे म्हणाले, पावसाळा दारावर आलेला असतानाही शहरातील नालेसफाईची कामे रखडलेलीच आहेत. आगामी पावसाळ्यात शहरात पाणी साचून नागरिकांचे अतोनात हाल होणार, हे आता स्पष्ट दिसत आहे.

सर्वसामान्य छोटे व्यापारी आणि शेतकऱ्यांचे पारंपरिक रविवार, शुक्रवार आणि पीर बाजार बंद करण्याचा निर्णय केवळ बिल्डरांचा फायदा करून देण्यासाठी घेण्यात आला आहे. एकीकडे मनपा १२०० कोटी रुपयांच्या कर्जात बुडालेली असताना, दुसरीकडे पदाधिकाऱ्यांच्या चैनीसाठी आलिशान ई-कार खरेदीचा घाट घातला जात आहे. जनतेच्या पैशांची ही निव्वळ उधळपट्टी असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

केवळ 'सिटी ट्रान्सफॉर्मेशन' आणि '2047 चे व्हिजन' अशा कागदी आणि चकचकीत घोषणा करून शहराचे मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत. भाजपचा हा 100 दिवसांचा कार्यकाळ शहराला प्रगतीऐवजी अधोगतीकडे घेऊन जाणारा आणि पूर्णपणे अपयशी ठरलेला असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande