
सोलापूर, 21 मे (हिं.स.)।
बालाजी अमाईन्स कंपनीने चिंचोळी एमआयडीसी येथील आपल्या युनिट-४ प्रकल्पामध्ये डायमिथाईल इथर (DME) उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून २० मे २०२६ पासून व्यावसायिक उत्पादनाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील पहिली आणि एकमेव कंपनी ठरली आहे.
डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरता येणारे स्वच्छ आणि कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जाते. जगातील अनेक युरोपीय आणि पाश्चिमात्य देशांमध्ये एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करून त्याचा वापर केला जातो. बालाजी अमाईन्सने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दरवर्षी एक लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला आहे. डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डी. राम रेड्डी यांनी सांगितले की, हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने बीआयएसने नुकताच नवीन आयएस कोड जाहीर केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रण करता येणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी डीएमई मिश्रण उपक्रमासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता पाहता पर्यायी इंधनांचा विकास काळाची गरज बनल्याचे त्यांनी नमूद केले. डीएमईच्या वापरामुळे एलपीजी आयातीवरील भारताचे अवलंबित्व कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्याने उत्पादन साठवण, हाताळणी, वाहतूक आणि रोड टँकरद्वारे परिवहन यासंदर्भातील भारतीय मानकांच्या अभावामुळे PESO परवानग्या व अन्य वैधानिक मंजुरी मिळविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे कंपनीने सांगितले. आंतरराष्ट्रीय मानकांचा अभ्यास करून आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
प्रारंभी एरोसोल उद्योग तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी पूर्णवेळ संचालक एन. राजेश्वर रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक गोविंद मेंचेकरे आणि महाव्यवस्थापक विनय दुर्गम उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड