
लातूर, 21 मे (हिं.स.)।
अहमदपूर नगर परिषदेत प्लॉट गुंठेवारी नियमितीकरणासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ आणि एका खासगी इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणामुळे नगर परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीच्या नावावरील प्लॉटची गुंठेवारी करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी नगर परिषद अहमदपूर येथे अर्ज दाखल करण्यात आला होता. या कामासाठी शहरस्तरीय तांत्रिक तज्ज्ञ एस. बी. सोलापुरे यांच्या वतीने एजंट म्हणून काम करणाऱ्या शिवपुजे यांनी १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी ३० हजार रुपये आधीच स्वीकारल्याचा आरोप आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ फेब्रुवारी २०२६ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, गुंठेवारी नियमितीकरण शुल्क प्रत्यक्षात १ लाख १९ हजार ६२१ रुपये असताना १ लाख ९१ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे समोर आले. यामधील अतिरिक्त ७१ हजार ३७९ रुपये ही लाचेची रक्कम असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
तक्रारदाराने अधिकृत शुल्क भरल्यानंतर त्याची पावतीही आरोपींकडून देण्यात आली. त्यानंतर लाच स्वीकृती होणार नसल्याची खात्री झाल्याने सापळा कारवाई स्थगित करण्यात आली.
या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नसून त्यांना बीएनएसएस कलमानुसार नोटीस बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक संतोष बर्गे यांनी केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis