
सोलापूर, 21 मे (हिं.स.)।
आगामी सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाने अधिकृत उमेदवार देऊन निवडणूक लढवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ता काकासाहेब कुलकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षीय ताकद आणि काँग्रेसची संघटनात्मक बांधणी लक्षात घेता या जागेवर काँग्रेसला प्राधान्य मिळावे, असे कुलकर्णी यांनी निवेदनात नमूद केले आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तळागाळात सक्रिय असून पक्षाचा जनाधार व्यापक असल्याचा दावाही त्यांनी केला.
मागील विधान परिषद निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत नव्या रणनीतीची गरज असल्याचे स्पष्ट झाले असून, केवळ जुनी राजकीय समीकरणे न पाहता स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद आणि जनाधाराला महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष हा “मोठा भाऊ” असल्याचे सांगत सोलापूर जिल्ह्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसशी संबंधित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक प्रभावीपणे कार्यरत असल्याचे कुलकर्णी यांनी नमूद केले.
सोलापूरची ही जागा महाविकास आघाडीसाठी महत्त्वाची असून आघाडी अधिक मजबूत करण्यासाठी काँग्रेसला संधी देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसचा विचार शेतकरी, युवक, कामगार आणि वंचित घटकांमध्ये आजही प्रभावी असून काँग्रेसचा उमेदवार दिल्यास कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक राजकीय वास्तवाचा विचार करून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्षालाच ही जागा द्यावी आणि पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला संधी द्यावी, अशी अपेक्षा काकासाहेब कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड