
पुणे, 21 मे (हिं.स.)।
काँग्रेसने पक्षाने पुणे शहर आणि जिल्ह्यात महत्त्वाचे संघटनात्मक बदल करत प्रत्येकी दोन शहराध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली आहे. पक्षातील गटबाजी कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
शहराच्या पूर्व भागासाठी नगरसेवक प्रशांत जगताप हे शहराध्यक्ष, तर पश्चिम भागासाठी माजी आमदार दीप्ती चवधरी यांंची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
शहराप्रमाणेच पुणे जिल्ह्यासाठीही दोन विभाग करण्यात आले असून ग्रामीण दक्षिण विभागासाठी लहू नवंगे आणि उत्तर विभागासाठी कमलाकर सातव यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दरम्यान, पिंपरी शहरासाठी मात्र एकच शहराध्यक्ष ठेवण्यात आला असून या पदावर नरेंद्र बनसोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्या काॅंग्रेसकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत.
पुण्यात काँग्रेसच्या शहराध्यक्षपदावरून गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या धर्तीवर काँग्रेसनेही पुण्यासाठी दोन शहराध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. त्यामुळे आता पुणे शहर आणि जिल्हा संघटनेत नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु