
सोलापूर, 21 मे (हिं.स.)।
देशातील युवकांची तुलना “झुरळांशी” केल्याच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रमक आंदोलन करण्यात आले. “होय, आम्ही झुरळ!” असा उपरोधिक मजकूर असलेली जॅकेट परिधान करून युवकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
शिक्षण, रोजगार, महागाई, कंत्राटीकरण, पेपरफुटी आणि खासगीकरणाच्या समस्यांशी देशातील युवक झुंज देत असताना न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदावरील व्यक्तीकडून असे वक्तव्य होणे अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. “हा केवळ शब्दांचा प्रश्न नसून युवकांच्या स्वाभिमानावर घाव आहे,” असे केंद्रीय समिती सदस्य ॲड. अनिल वासम यांनी सांगितले.
राज्य सचिव दत्ता चव्हाण म्हणाले, “देशातील युवक भीक मागत नाहीत, तर आपल्या हक्काची मागणी करत आहेत. युवकांना ‘झुरळ’ समजणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, याच युवकांच्या श्रमावर देश उभा आहे.”
आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन सादर केले. जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यावेळी प्रतीकात्मक झुरळाची प्रतिमाही प्रशासनाला सादर करण्यात आली.
निवेदनाद्वारे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि भारताचे सरन्यायाधीश यांच्याकडे चार प्रमुख मागण्या करण्यात आल्या. संबंधित न्यायाधीशांनी युवकांची जाहीर माफी मागावी, सर्वोच्च न्यायालयाने अधिकृत स्पष्टीकरण द्यावे, युवकांविरोधातील अपमानास्पद वक्तव्यांची दखल घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करावी तसेच युवकांच्या प्रश्नांवर तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
या आंदोलनात दत्ता चव्हाण, ॲड. अनिल वासम, बाळकृष्ण मल्याळ, विजय हरसुरे, अश्विनी मामाड्याल, नरेश गुल्लापल्ली, अभिजित निकंबे, दिनेश बडगु, चंटी बिटला, राधागोपाल बंडी आदी सहभागी झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड