
अमरावती, 21 मे (हिं.स.)
अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महायुतीमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वाखालील युवा स्वाभिमान पक्षाने यावेळी भाजपच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रवि राणा यांचे बंधू सुनील राणा यांना उमेदवारी देण्याच्या हालचालींमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वालाच दिलेले आव्हान मानले जात आहे.भाजपकडून या जागेसाठी माजी मंत्री प्रवीण पोटे यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त होत असताना, राणा गटाने वेगळी रणनीती आखल्याचे दिसून येत आहे. सुरुवातीला शहर भाजपाध्यक्ष नितीन धांडे यांचे नाव पुढे करून भाजपमध्ये नाराजी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर सुनील राणा यांचे नाव चर्चेत आणत राणा गटाने भाजप नेतृत्वावर दबाव वाढवल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, सुनील राणा यांनी नुकतीच काँग्रेस नेत्या व माजी मंत्री यशोमति ठाकुर यांची वाढदिवसानिमित्त भेट घेतल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. या भेटीमागे महाविकास आघाडीसोबत संभाव्य राजकीय समीकरणांची चाचपणी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सोशल मीडियावरही युवा स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते सक्रिय झाले असून, सुनील राणा यांच्या संभाव्य उमेदवारीच्या समर्थनार्थ पोस्ट आणि व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच समर्थकांकडून विजयाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाल्याने भाजपची चिंता वाढल्याचे मानले जात आहे.राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीतील चर्चेत सुनील राणा यांच्या नावावर एकमत न झाल्यास ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवू शकतात. तसे झाल्यास विदर्भातील राजकारणात मोठे बदल घडू शकतात. भाजपमधील नाराज नेते आणि काही स्थानिक प्रतिनिधी देखील त्यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी