
बीड, 21 मे (हिं.स.)अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेला तब्बल २ लाख २६ हजार २७५ रुपये किमतीचा अवैध दारूचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला. पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या धडक भूमिकेमुळे तालुक्यातील अवैध मद्यविक्री आणि साठवणूक करणाऱ्या भूमाफियांमध्ये व गुन्हेगारांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या थेट उपस्थितीत आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (एसओपी) ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यात आली. या धडक कारवाईमुळे अंबाजोगाई शहर व परिसरात शांतता व सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत होणार असून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यास साहाय्य मिळणार असल्याची भावना सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कालखंडात दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल झालेल्या एकूण ४८ गुन्ह्यांमधील हा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यामध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या देशी व विदेशी मद्याच्या बाटल्यांचा समावेश होता. ही दारू सुरक्षित पद्धतीने बाटल्यांमधून बाहेर काढून पंचांसमक्ष जमिनीत ओतून नष्ट करण्यात आली. अंबाजोगाई शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२५ मध्ये पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूविरोधात तब्बल १२० यशस्वी कारवाया करण्यात आल्या होत्या. चालू वर्षातही ही मोहीम सातत्याने सुरू असून आगामी काळात अवैध दारूची वाहतूक, विक्री आणि साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध आणखी कठोर पावले उचलली जातील, असा स्पष्ट इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis