
जळगाव, 21 मे, (हिं.स.) “जिल्हा परिषदेच्या शाळा या ग्रामीण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणजे खऱ्या अर्थाने नवीन पिढी घडविणारे मंदिर आहे. त्यामुळे शिक्षकांनी येणाऱ्या काळात या शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची जिल्हास्तरीय आढावा बैठक गुरुवार, २१ मे २०२६ रोजी जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत उपस्थित केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या महत्त्वपूर्ण आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (DIET) प्राचार्य डॉ. अनिल झोपे आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या निपुण भारत अभियानाच्या अंमलबजावणीचा आढावा घेताना जिल्हाधिकारी घुगे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी जिल्हा परिषदेच्या शाळांपासूनच सुरू होते. येणाऱ्या काळात ज्या शाळा आपली पटसंख्या वाढविण्यात यशस्वी ठरतील, त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या (DPDC) माध्यमातून भरघोस निधी दिला जाईल. उत्कृष्ट कामगिरी करून पटसंख्या व गुणवत्ता वाढविणाऱ्या शाळांचा जिल्हा स्तरावर विशेष गौरव देखील केला जाईल. शिक्षकांनी याकडे विशेष लक्ष देऊन मेहनत घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर