लासलगावमध्ये कांदा खरेदीचा आढावा
Nafed team in Nashik district due to onion shortage
Nafed team in Nashik


नाफेड अधिकाऱ्यांची विविध बाजार समित्यांना भेटलासलगाव, 21 मे (हिं.स.) : कांदा प्रश्नावर राज्यातील वातावरण तापलेले असतानाच नाफेडच्या अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांना भेट देत कांदा खरेदी प्रक्रियेचा आढावा घेतला. पिंपळगाव बसवंतनंतर उमराणा, देवळा आणि चांदवड कृषी उत्पन्न बाजार समित्या तसेच नाफेडच्या गोदामांची पाहणी अधिकाऱ्यांनी केली.

या दौऱ्यात अधिकाऱ्यांनी गोदामांची साठवण क्षमता, नव्याने प्रस्तावित गोदामांची स्थिती तसेच खरेदी व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला. केंद्र शासनाने नाफेड आणि एनसीसीएफमार्फत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्ट दिले असताना प्रत्यक्षात अत्यल्प खरेदी झाल्याने अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

बाजार समित्यांमधील सध्याचे दर, मागील वर्षातील दर आणि साठवणूक व्यवस्था याबाबतही तपशीलवार माहिती घेण्यात आली. तसेच प्रत्येक बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर कांद्याचे दर दर्शविणारे फलक लावण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ‘कांदा एल्गार’ आंदोलनानंतर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पिंपळगाव बाजार समिती व नाफेड गोदामाला भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. त्यानंतर नाफेडच्या अधिकाऱ्यांचा हा दौरा झाला.

यंदा कांदा खरेदी प्रक्रिया कृषी संस्थांच्या माध्यमातून राबविण्याची तयारी सुरू असून, खरेदी केलेला कांदा केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामांमध्ये साठवला जाणार आहे. मात्र खरेदी केंद्रांची संख्या मर्यादित असल्याने आणि अपेक्षित प्रमाणात खरेदी न झाल्याने नाफेडच्या व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, कांद्याला मिळणारे दर उत्पादन खर्चही भरून काढत नसल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी 26 मे रोजी चांदवड येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला असून कांदा प्रश्न आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, प्रत्येक तालुक्यात विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली असून कृषी, पणन आणि महसूल विभागाचे अधिकारी त्यात सहभागी आहेत. कांदा खरेदी व दराची माहिती देण्यासाठी नाफेडकडून होर्डिंग्ज लावले जात असून, नोंदणी व पीक पाहणी प्रक्रियेत अडथळे येऊ नयेत यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.---------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande