
अमरावती, 21 मे (हिं.स.)।
दर्यापूर शहरात एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञात इसमांनी चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना संपूर्णपणे खोटी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आई रागावल्याच्या तणावातून मुलीने स्वत:च चाकूने स्वत:ला दुखावत करून घेतली होती आणि घाबरून हल्ल्याच्या खोटा बनाव रचला होता, अशी माहिती दर्यापूर पोलिसांनी दिली आहे.
दर्यापूर येथील आनंदनगर भागात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार २० मे रोजी दर्यापूर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. या घटनेमुळे या शहरात भीतीचे वातावरण पसरले आणि समाज माध्यमांवर देखील यासंदर्भातील बातम्या वेगाने प्रसारित झाल्या. घटनेचे गांभीर्य ओळखून अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात दर्यापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील वानखडे यांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपींच्या शोधासाठी दोन स्वतंत्र पथके तयार केली.
सीसीटीव्ही आणि चौकशीमुळे बनाव उघड
तपासादरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक नम्रता राठोड यांनी पीडित मुलगी आणि तिच्या आईला विश्वासात घेऊन स्वतंत्रपणे विचारपूस केली. सुरूवातीला मुलीने आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा केला. मात्र पोलिसांनी आनंद नगर परिसरातील मुख्य रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रिकरण तपासले असता, घटना घडली, त्यावेळेत तेथून संशयास्पद रितीने कोणतीही मोटारसायकल ये-जा करताना दिसली नाही. यामुळे महिला अधिकाऱ्यांचा संशय बळावला.
पोलीस पथकाने पुन्हा एकदा मुलगी आणि तिच्या आईला विश्वासात घेऊन सखोल विचारपूस केली असता, मुलीचे सत्य कबूल केले. आदल्या रात्री आई रागावल्यामुळे ती मानसिक तणावात होती. दुसऱ्या दिवशी ती स्वयंपाकखोलीत चाकूने भाजी कापत असताना, विचारांच्या भरात तिने स्वत:च्या हातावर आणि गळ्यावर चाकू ओढून घेतला. यामुळे रक्त निघू लागल्याने ती प्रचंड घाबरली. आईने घरी येऊन रक्ताबाबत विचारले असता, घाबरलेल्सा मुलीने चेहरा झाकून आलेल्या दोन मुलांनी हल्ला केल्याचा खोटा बनाव रचला. आईने मुलीच्या सांगण्यावर विश्वास ठेवून पोलीस ठाण्यात धाव घेतली, परंतु प्रत्यक्षात अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे मुलीने मान्य केले आहे. दर्यापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या घटनेमागचे सत्य समोर आणून समाज माध्यमांवरील अफवांना पूर्णविराम दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी