पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पाच देशांच्या नेत्यांना दौऱ्यादरम्यान दिल्या विशेष भेटवस्तू
नवी दिल्ली , 21 मे (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात भारताच्या सांस्कृतिक वारशाला, पारंपरिक कलेला आणि कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर विशेष ओळख म
पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पाच देशांच्या नेत्यांना दौऱ्यादरम्यान दिल्या विशेष भेटवस्तू


नवी दिल्ली , 21 मे (हिं.स.)।पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या पाच देशांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात भारताच्या सांस्कृतिक वारशाला, पारंपरिक कलेला आणि कृषी उत्पादनांना जागतिक स्तरावर विशेष ओळख मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी विविध देशांच्या नेत्यांना भारताच्या विविध परंपरा आणि हस्तकलेशी संबंधित खास भेटवस्तू प्रदान केल्या.

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना पंतप्रधान मोदी यांनी आसामची प्रसिद्ध मूगा सिल्क स्टोल भेट दिली. “गोल्डन सिल्क” म्हणून ओळखली जाणारी मूगा सिल्क ही ईशान्य भारतातील ब्रह्मपुत्रा खोऱ्याची दुर्मिळ आणि प्रतिष्ठित पारंपरिक ओळख मानली जाते. तिचा नैसर्गिक सोनेरी रंग आणि साधेपणातील आकर्षण तिला विशेष बनवतो. कोणत्याही कृत्रिम रंगांशिवाय तयार होणारी ही सिल्क पर्यावरणपूरक आणि शाश्वत परंपरेचे प्रतीक मानली जाते. मूगा सिल्क जगातील सर्वात मजबूत नैसर्गिक तंतूंमध्ये गणली जाते आणि तिची चमक काळानुसार अधिक खुलत जाते. ओलावा शोषून घेण्याची आणि अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण देण्याची क्षमता असल्याने ती अत्यंत उपयुक्त मानली जाते. इटलीच्या लक्झरी टेक्स्टाइल परंपरा आणि आसामच्या गोल्डन सिल्कमध्ये एक नैसर्गिक सांस्कृतिक संबंधही दिसून येतो.

पंतप्रधान मोदी यांनी मेलोनी यांना शिरुई लिली सिल्क स्टोलही भेट दिली. ही स्टोल मणिपूरमधील शिरुई काशोंग पर्वताच्या धुक्याने वेढलेल्या टेकड्यांपासून प्रेरित आहे. तिची रचना दुर्मिळ शिरुई लिली फुलावर आधारित असून हे हलक्या गुलाबी-पांढऱ्या रंगाचे घंटेसारख्या आकाराचे फूल जगात फक्त मणिपूरमध्येच आढळते. तंगखुल नागा समुदायासाठी हे फूल पवित्रता, सांस्कृतिक ओळख आणि अभिमानाचे प्रतीक मानले जाते. ही स्टोल हिमालयीन हस्तकलेचे सौंदर्य, आदिवासी परंपरा आणि लोककथांचा वारसा दर्शवते. इटलीतही लिली फूल पवित्रता, सौंदर्य आणि कलात्मक परिष्करणाचे प्रतीक मानले जाते आणि पुनर्जागरणकालीन कलांमध्ये त्याचे विशेष स्थान आहे. या समान सांस्कृतिक प्रतीकवादामुळे भारत आणि इटली यांच्यात एक अनोखा सांस्कृतिक दुवा निर्माण झाल्याचे दिसून आले.

इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मत्तारेला यांना पंतप्रधान मोदी यांनी आग्र्याच्या प्रसिद्ध पच्चीकारी कलेतील मार्बल इनले वर्क बॉक्स तसेच पंडित भीमसेन जोशी आणि एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांच्या संगीताच्या सीडी भेट दिल्या. मार्बल इनले बॉक्स हा भारताच्या हस्तकला परंपरेचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. पच्चीकारी किंवा पिएत्रा ड्यूरा कलेची सुरुवात इटलीतील फ्लॉरेन्स शहरात झाली होती आणि नंतर भारतात शाही संरक्षणाखाली ती अधिक विकसित झाली. त्यामुळे हा उपहार भारत आणि इटलीमधील ऐतिहासिक कलात्मक नात्याचे प्रतीक ठरला.

संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्रपती मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांना पंतप्रधान मोदी यांनी गुजरातच्या जीआय टॅग असलेल्या केसर आंब्यांची भेट दिली. “क्वीन ऑफ मॅंगोज” म्हणून ओळखला जाणारा हा आंबा गुजरातच्या जुनागढ भागाशी संबंधित असून त्याचा केशरी रंग, बिनतंतुमय गर आणि खास सुगंधासाठी तो प्रसिद्ध आहे. गुजरातच्या पारंपरिक आमरस संस्कृतीत या आंब्याला विशेष महत्त्व आहे.

यूएईचे युवराज यांना पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानच्या पारंपरिक कोफ्तगिरी कलेने सजवलेली औपचारिक कटार भेट दिली. ही कटार भारताच्या युद्धक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक मानली जाते. उदयपूरमधील सिकलीगर आणि पारंपरिक धातुकाम करणारे कारागीर स्टीलवर सोने-चांदीच्या बारीक तारा वापरून फुलांच्या आणि भूमितीय आकृत्यांची नक्षी करतात. राजपूत काळात ही कला शाही प्रतिष्ठा आणि सन्मानाचे प्रतीक मानली जात होती. भारतीय हस्तनिर्मित कटार आणि अमिराती खंजर परंपरेतील साम्यामुळे हा उपहार अधिक खास ठरला.

पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेचे (FAO) महासंचालक क्यू डोंगयु यांना भारतातील विविध प्रसिद्ध तांदळाच्या जातींचे नमुने भेट दिले. यामध्ये केरळचा पलक्कड रेड राइस, पश्चिम बंगालचा गोविंदभोग तांदूळ, इंडो-गंगेटिक प्रदेशातील बासमती तांदूळ, आसामचा जोहा राइस आणि उत्तर प्रदेशचा कालानमक तांदूळ यांचा समावेश होता. या सर्व तांदळांच्या जाती त्यांच्या खास सुगंध, चव आणि पोषणमूल्यांसाठी प्रसिद्ध आहेत. कालानमक तांदळाला “बुद्धा राइस” असेही म्हटले जाते, तर बासमतीला “क्वीन ऑफ फ्रेगरन्स” म्हणून ओळखले जाते.

याशिवाय, पंतप्रधान मोदी यांनी एफएओ महासंचालकांना हेल्दी मिलेट बार्सही भेट दिले. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पिकवले जाणारे ज्वारी आणि बाजरीसारखे भरड धान्य पोषणमूल्ये, तंतुमय घटक आणि प्रथिनांनी समृद्ध मानले जाते. ही पिके हवामानास अनुकूल असून आधुनिक आरोग्यदायी खाद्यपदार्थ म्हणून झपाट्याने लोकप्रिय होत आहेत. मिलेट बार्सना भारताच्या पारंपरिक शेती आणि आधुनिक आरोग्य संस्कृतीचा संगम मानले जात आहे.

नेदरलँड्सचे राजा विलेम-अलेक्झांडर यांना पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानची प्रसिद्ध ब्लू पॉटरी भेट दिली. जयपूरची जीआय-टॅग असलेली ब्लू पॉटरी कोबाल्ट निळा, पांढरा आणि पिवळ्या रंगांच्या आकर्षक डिझाइन्ससाठी जगभर प्रसिद्ध आहे. ही कला मातीऐवजी क्वार्ट्ज पावडर, काचेचा चुरा आणि फुलर्स अर्थ यांच्या विशेष मिश्रणातून तयार केली जाते, त्यामुळे त्याला काचेप्रमाणे चमक प्राप्त होते. विशेष फायरिंग तंत्रामुळे या कलाकृतींना अनोखा पारदर्शकपणा आणि गडद निळा रंग मिळतो. या कलेत फुले आणि पक्ष्यांच्या बारीक आकृत्या रेखाटल्या जातात.

नेदरलँड्सच्या राणी मॅक्सिमा यांना पंतप्रधान मोदी यांनी मीनाकारी आणि कुंदन इयररिंग्स भेट दिले. राजस्थानच्या शाही परंपरेशी जोडलेली ही कला भारतीय दागिन्यांच्या कारागिरीचे उत्कृष्ट उदाहरण मानली जाते. मीनाकारीमध्ये धातूंवर रंगीत एनामेलचे नाजूक काम केले जाते, तर कुंदन कलेत न कापलेली रत्ने सोन्याच्या पत्र्यामध्ये जडवली जातात. पारंपरिक कारागिरी आणि आधुनिक सौंदर्य यांचा सुंदर संगम या दागिन्यांत दिसून येतो.

पंतप्रधान मोदी यांनी नेदरलँड्सचे पंतप्रधान रॉब जेटेन यांना माशाच्या आकारातील मधुबनी चित्रकला भेट दिली. मिथिला प्रदेशातील जीआय-टॅग असलेली मधुबनी कला भूमितीय आकृत्या आणि चमकदार रंगांसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिकरीत्या महिलांकडून तयार केली जाणारी ही कला सण, विवाह आणि धार्मिक विधींमध्ये वापरली जाते. भारतीय लोककथा आणि पौराणिक कथांपासून प्रेरित या कलेत फुले, झाडे, पक्षी आणि मासे यांसारख्या प्रतीकांना विशेष महत्त्व आहे.

नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांना पंतप्रधान मोदी यांनी प्रेस्ड ऑर्किड पेंटिंग आणि ऑर्किड पेपरवेट्स भेट दिले. सिक्कीमच्या धुक्याने वेढलेल्या दऱ्यांतून आणलेल्या खऱ्या ऑर्किड आणि फर्न वनस्पतींपासून या कलाकृती तयार करण्यात आल्या आहेत. स्थानिक कारागिरांनी अत्यंत काळजीपूर्वक त्यांचे संवर्धन केले आहे. भारतातील पहिले सेंद्रिय राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिक्कीमशी संबंधित ही कला पर्यावरण संवर्धन, पारंपरिक हस्तकला आणि शाश्वत विकासाचा संदेश देते. निसर्ग आणि पर्यावरणीय टिकावाबाबत नॉर्वेच्या विशेष जाणीवेच्या पार्श्वभूमीवर हा उपहार सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande