
लातूर, 21 मे (हिं.स.) राज्यात सन २०२६ ते २०४७ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या महत्त्वाकांक्षी ३०० कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची ‘लँड बँक’ तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्यांनी विविध विभागांना सूक्ष्म नियोजन करून अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश दिले.
बैठकीला रोहयोचे उपजिल्हाधिकारी संदीप कुलकर्णी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संजय इंगळे, लातूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, सामाजिक वनीकरण विभागाचे उपवन संरक्षक अमितराज जाधव, सहायक वनसंरक्षक मदन क्षीरसागर, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेलार आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात २०२६ ते २०४७ या कालावधीत तब्बल ३०० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा असलेली जमीन, गायरान, पडीक क्षेत्र तसेच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचे सर्वेक्षण करून वृक्षारोपणासाठी योग्य जागांची निवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, २५ मे ते ५ जून २०२६ या कालावधीत सर्व उपलब्ध जमिनींची माहिती संकलित करून जीआयएस प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल ‘लँड बँक’ तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर संबंधित विभागांना त्यांच्या कार्यक्षेत्रानुसार वृक्षलागवडीची उद्दिष्टे निश्चित करून देण्यात येतील.
ही संपूर्ण मोहीम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत राबविण्यात येणार असून महिला बचत गटांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यात येणार आहे. महिला बचत गटांमार्फत रोपवाटिका निर्मिती, वृक्षलागवड व संगोपनाची कामे केली जाणार असून यामुळे ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध होऊन महिला सक्षमीकरणालाही चालना मिळणार आहे.
बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, वनविभागाचे प्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांचे समन्वयक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis