
सोलापूर, 21 मे (हिं.स.)।
भारत निवडणूक आयोगाने १८ मे रोजी महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांप्रमाणेच ही आचारसंहिता लागू राहणार असल्याने सर्व राजकीय पक्ष आणि शासकीय यंत्रणांनी तिचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधी तसेच शासकीय यंत्रणाच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तिकेयन मार्गदर्शन करत होते. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके तसेच विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यावेळी एस. कार्तिकेयन यांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, निवडणुकीची अधिसूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे. नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १ जून असून, अर्जांची छाननी २ जून रोजी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ जून आहे.
मतदान १८ जून २०२६ रोजी गुरुवारी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार असून, मतमोजणी २२ जून रोजी केली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया २५ जून २०२६ रोजी पूर्ण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडणुकीत जिल्हा परिषद, तसेच १७ नगरपरिषद आणि नगरपंचायतींसह एकूण १९ स्थानिक संस्था सहभागी होणार आहेत. एकूण ६१६ मतदार असून, त्यात ५४४ सामान्य मतदार, ४९ नामनिर्देशित आणि २३ अध्यक्षीय मतदारांचा समावेश आहे.
नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी कार्यालयातील कलेक्टर चेंबर निश्चित करण्यात आले आहे. अर्ज दाखल करण्याची वेळ सकाळी ११ ते दुपारी ३ अशी राहणार असून अर्ज शुल्क १०० रुपये आहे. खुल्या गटासाठी ठेव रक्कम १० हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गासाठी ५ हजार रुपये ठेवण्यात आल्याची माहितीही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड