
सोलापूर, 21 मे (हिं.स.)।
जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या निर्देशानुसार अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना निशुल्क आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा द्यावी. उपचार, शुल्क किंवा वैद्यकीय हलगर्जीपणासंदर्भात रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाईकांकडून एकही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी कार्तिकेयन बोलत होते.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवार, जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक प्रवीण गुंजाळ, नगरपालिकेचे जिल्हा प्रशासन अधिकारी योगेश डोके यांच्यासह योजनेचे अंगीकृत शासकीय व खाजगी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, प्रतिनिधी तसेच जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष हनुमंत कुंभार उपस्थित होते.
या योजनेंतर्गत प्रति कुटुंब दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य संरक्षण दिले जाते. यामध्ये २७ विशेष सेवांअंतर्गत २३९९ प्रकारचे आरोग्य उपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे अंगीकृत रुग्णालयांनी रुग्ण दाखल होताच त्यांना तात्काळ योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
या योजनेंतर्गत रुग्णालयांविषयी रुग्णांच्या तक्रारी येणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक असून, आपण स्वतः जिल्ह्यातील रुग्णालयांना अचानक भेटी देणार आहोत. या कालावधीत रुग्णांना योग्य उपचार न देणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड