
सोलापूर, 21 मे (हिं.स.)। सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा यंदा एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रभाग क्रमांक २ च्या नगरसेविका शालन शिंदे या जिल्हा मध्यवर्ती कारागृहातून ऑनलाइन पद्धतीने महासभेत सहभागी होणार आहेत.
या सहभागासाठी महापालिका सभागृह तसेच जिल्हा मध्यवर्ती कारागृह येथे वेब कॅमेऱ्यासह आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. ऑनलाइन उपस्थिती सुरळीत पार पडावी यासाठी पूर्वतयारीची पाहणीही करण्यात आली.
यावेळी सभागृहनेते नरेंद्र काळे आणि नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी उपस्थित राहून तांत्रिक व्यवस्थेची माहिती घेतली तसेच तयारीचा आढावा घेतला.
महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एखाद्या नगरसेविकेस कारागृहातून ऑनलाइन माध्यमातून महासभेत सहभागी होण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने या घडामोडीकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष लागले आहे.
दरम्यान, नगरसेविका शालन शिंदे या मनसे विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे यांच्या खून प्रकरणात सध्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड