
सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। शासनाने विकासाच्या नावाखाली प्रस्तावित केलेला शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर घाला घालणारा असल्याचा आरोप करत वेळापूर आणि परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. “शेती वाचली तरच गाव आणि संस्कृती वाचेल,” असा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे.
महामार्गाविरोधात साेलापूरातील वेळापूर येथे बाधित शेतकरी, बागायतदार आणि स्थानिक नागरिकांची तातडीची बैठक पार पडली. या बैठकीला परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या किसान सेलचे राज्य कार्याध्यक्ष कमलाकर माने-देशमुख यांनी बैठकीला संबोधित करत महामार्गामुळे होणाऱ्या परिणामांची माहिती दिली.
वेळापूर, माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यातील हा भाग ऊस, फळबागा आणि नगदी पिकांसाठी ओळखला जातो. मात्र प्रस्तावित महामार्गाच्या आराखड्यात हजारो एकर सुपीक आणि बारमाही ओलिताखालील जमीन बाधित होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
“महामार्गामुळे आमची सुपीक शेती नष्ट होणार आहे. ज्या जमिनींवर आमच्या कुटुंबाची उपजीविका अवलंबून आहे, त्या हिरावल्या जाणार आहेत. अनेकांची घरेही बाधित होत आहेत. या वयात पुन्हा संसार कसा उभा करायचा?” असा सवाल महिला शेतकऱ्यांनी बैठकीत उपस्थित केला.
यावेळी कमलाकर माने-देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीला बापूसाहेब पनासे, सय्यम काळे, संतोष काशिद, उत्तम काशिद, दत्तात्रय टिक, सचिन इंगोले, संतोष जगताप, अतुल पवार, तुकाराम काशिद, राजू कांबळे, अतुल मोहिते, अनिकेत घाणेकर, दीपक मस्के, विकास माने, सचिन माने-देशमुख, बाळकृष्ण माने-देशमुख, धनाजी माने-देशमुख, महेश माने, विलास माने, सुधाकर माने, शरद माने, भरत माने आणि विष्णू पिंगळे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड