सोलापूर : जिल्ह्यात इंधन तुटवडा नाही; नागरिकांनी घाबरून साठवणूक करू नये
सोलापूर, 21 मे (हिं.स.)।जिल्ह्यातील HPCL, BPCL आणि IOCL या प्रमुख तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचा नियमित पुरवठा सुरू असून सुमारे सात दिवसांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आव
Petrol Pump


सोलापूर, 21 मे (हिं.स.)।जिल्ह्यातील HPCL, BPCL आणि IOCL या प्रमुख तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेलचा नियमित पुरवठा सुरू असून सुमारे सात दिवसांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणतीही चिंता करू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी HPCL, BPCL आणि IOCL या तेल कंपन्यांच्या डेपो व्यवस्थापक व विक्री अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. बैठकीत जिल्ह्यातील पेट्रोल-डिझेल साठा आणि वितरण व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडेले तसेच विविध तेल कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे यांनी इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी पेट्रोलपंप चालकांकडून इंधनाचे पूर्ण देयक मिळाल्यानंतरच पुरवठा केला जात असल्याची माहिती दिली.

इंधनाचा काळाबाजार रोखण्यासाठी वाहनाशिवाय प्लास्टिक ड्रम किंवा बाटल्यांमध्ये इंधन घेणाऱ्या ग्राहकांची नोंद ठेवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. संबंधित ग्राहकांचे नाव, मोबाईल क्रमांक, ओळखपत्र, इंधनाचा वापर आणि नेण्याचे ठिकाण यासह मोबाईलमधील छायाचित्राची नोंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कृत्रिम इंधन तुटवडा निर्माण होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून नियमित पुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. HPCL, BPCL आणि IOCL या तिन्ही कंपन्यांकडे पेट्रोल आणि डिझेलचा सुमारे सात दिवसांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

जिल्ह्यात एकूण ४२० पेट्रोलपंप असून सर्वत्र इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. पाकणी डेपो येथे मुंबईतील रिफायनरीमधून पाइपलाइनद्वारे सातत्याने इंधन पुरवठा सुरू असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सोलापूर जिल्ह्याला दररोज सुमारे ६२४ किलो लिटर पेट्रोल आणि १२४० किलो लिटर डिझेलची आवश्यकता भासते. आवश्यकतेनुसार पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी घाबरून इंधन साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, पंतप्रधान माेदी यांच्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी दररोज किमान एक टक्का इंधन बचत करण्याचे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande