रायगडावर सुरक्षा उपाययोजना; 30 व 31 मे रोजी पायरी मार्ग बंद राहणार
रायगड, 21 मे (हिं.स.)। किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. 30 मे व 31 मे 2026 या दोन दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर चढ-उतार करण्याचा पा
Security measures at Raigad; Footpaths will be closed on May 30 and 31


रायगड, 21 मे (हिं.स.)। किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रणासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दि. 30 मे व 31 मे 2026 या दोन दिवसांसाठी रायगड किल्ल्यावर चढ-उतार करण्याचा पायरी मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष किशन जावळे यांनी जारी केले आहेत.

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा तारखेनुसार 6 जून तर तिथीनुसार 26 जून 2026 रोजी साजरा होणार असून राज्यभरातून मोठ्या संख्येने शिवभक्त आणि मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यामुळे गर्दी व्यवस्थापन आणि संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी प्रशासनाकडून विशेष उपाययोजना करण्यात येत आहेत.

सन 2023 मधील शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी महादरवाजाखालील उंच कड्यावरून दगड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर यावर्षीही धोका टाळण्यासाठी कड्यावरील सैल दगड आणि दरड हटविण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ही मोहीम दुर्गवीर प्रतिष्ठान, मुंबई यांच्या प्रशिक्षित रॅपलर्सच्या मदतीने पार पडणार आहे.

या मोहिमेदरम्यान पायरी मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून दोन दिवस पायी मार्ग पूर्णतः बंद ठेवण्याची विनंती मार्ग प्रकल्प विभाग, महाड (विशेष पथक रायगड किल्ला) यांनी केली होती. त्यानुसार प्रशासनाने आदेश लागू केले आहेत.

या काळात चित्त दरवाजा, नाणेदरवाजा आणि शिर्काई मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. दरम्यान, रायगड रोपवे सेवा मात्र नियमित सुरू राहणार असल्याने पर्यटक आणि शिवभक्तांना रोपवेचा पर्याय उपलब्ध असणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande