
सोलापूर, 21 मे, (हिं.स.)। शहरातील सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था तात्काळ थांबवावी, अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने महानगरपालिकेतच शौचास बसून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. सिद्धेश्वर मंदिरासमोरील रहिमतबी टेकडी परिसरातील सार्वजनिक शौचालयाच्या अत्यंत खराब अवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि अपुऱ्या सुविधांमुळे येथील सुमारे हजार ते बाराशे नागरिकांचे हाल होत असल्याचे सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळाने स्थानिक नागरिकांसह सहाय्यक आयुक्त भोसले यांची भेट घेत निवेदन सादर केले. निवेदनाची दखल घेत सहाय्यक आयुक्तांनी विभागीय कार्यालय प्रमुखांना तातडीने पाहणी करून शौचालय दुरुस्तीचे आदेश दिले. तसेच पुढील महिन्यात वातानुकूलित “आकांक्षा” शौचालयासाठी टेंडर काढून ते नागरिकांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
संभाजी ब्रिगेडने शहरातील अनेक सामुदायिक व सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट असल्याचा आरोप केला. अनेक ठिकाणी पाण्याचा तुटवडा, तुटलेले दरवाजे, विजेची अपुरी व्यवस्था आणि अस्वच्छतेमुळे नागरिकांना शौचालयांचा वापर करणे कठीण झाले आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित स्वच्छतागृहांचा अभाव असल्याने महिलांची मोठी गैरसोय होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले.
पालिकेने लाखो रुपये खर्च करून उभारलेली ई-टॉयलेट्सही बहुतांश ठिकाणी बंद किंवा निकृष्ट अवस्थेत असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच शहरातील चार ठिकाणी उभारण्यात आलेली वातानुकूलित आकांक्षा शौचालये तातडीने सुरू करावीत, होम मैदान परिसरात आणि सिद्धेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनल दास, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा कोई, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष विक्रम वानकर, जिल्हा सचिव राजेंद्र माने, जिल्हा संघटक विशाल साळुंखे, आकाश भोसले, इरफान शेख, आकाश साळुंखे, इरफान कामतीकर आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड