
कोलकाता , 21 मे (हिं.स.)।पश्चिम बंगालमधील शुभेंदू सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. बंगाल सरकारच्या अल्पसंख्याक कार्य आणि मदरसा शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, राज्यातील सर्व मदरसांमध्ये आता ‘वंदे मातरम्’ गायन अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी, अनुदानित तसेच विनाअनुदानित सर्व मदरसांना हा आदेश लागू असेल आणि त्याचे पालन करणे बंधनकारक असेल.
यापूर्वी गेल्या आठवड्यात शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांना एक नोटीस जारी करून दररोज वर्ग सुरू होण्यापूर्वी ‘वंदे मातरम्’ गायन सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले होते. आदेशात म्हटले होते की, सकाळच्या प्रार्थना सभेमध्ये ‘वंदे मातरम्’चे गायन अनिवार्य करण्यात यावे, जेणेकरून राज्यातील सर्व विद्यार्थी तत्काळ प्रभावाने हे गीत गातील. राज्य सरकारचा हा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने जानेवारी महिन्यात जारी केलेल्या त्या निर्देशानंतर आला आहे, ज्यामध्ये राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षपूर्तीच्या निमित्ताने त्याचे गायन करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
यापूर्वीच्या व्यवस्थेनुसार शाळांच्या सकाळच्या प्रार्थना सभेत (बांग्लार माटी बांग्लार जल) हे गीत गायन अनिवार्य होते. मात्र, नव्या आदेशात हे स्पष्ट करण्यात आलेले नाही की राज्यगीत आता ‘वंदे मातरम्’ आणि राष्ट्रगीतासोबत कायम ठेवले जाणार की नाही.काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी या निर्णयाबाबत व्यावहारिक अडचणींचा मुद्दा उपस्थित केला आहे. एका शाळा प्रमुखांनी सांगितले की, “आम्ही राष्ट्रगीत काढून टाकू शकत नाही, कारण ते अनिवार्य आहे. आता प्रथम ‘वंदे मातरम्’ गायले जाईल आणि त्यात राज्यगीतही जोडले गेले, तर अधिक वेळ लागेल. त्यामुळे वर्ग सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. नोटीसमध्ये राज्यगीताबाबत काहीही स्पष्ट केलेले नाही. विद्यार्थ्यांना सलग तीन गीते म्हणण्यासाठी थांबवणे सोपे नाही.”
शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, नव्या निर्देशात केवळ ‘वंदे मातरम्’बाबत आदेश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्याने म्हटले, “आम्हाला शालेय प्रार्थनेचा भाग म्हणून ‘वंदे मातरम्’ सुरू करण्यास सांगितले आहे. मात्र, राज्यगीताचा कुठेही उल्लेख करण्यात आलेला नाही.”दरम्यान, अनेक शाळांनी या आदेशाची अंमलबजावणी सुरूही केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode