सोलापूरमध्ये कर्ज नाकारल्यास लेखी कारण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आदेश
सोलापूर, 21 मे (हिं.स.)जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांसह विविध राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कर्जवितरण
सोलापूरमध्ये कर्ज नाकारल्यास लेखी कारण देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे बँकांना आदेश


सोलापूर, 21 मे (हिं.स.)जिल्हास्तरीय बँक सल्लागार समितीची बैठक जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांसह विविध राष्ट्रीयकृत, खासगी आणि सहकारी बँकांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीत कर्जवितरणाची प्रगती, खाते उघडणीचे कामकाज तसेच समितीने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी सर्व बँकांनी देण्यात आलेले टार्गेट शंभर टक्के पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. उद्दिष्टपूर्तीसाठी प्रभावी नियोजन करण्यावर भर देत प्रत्येक बँकेने किमान ७५ टक्के खाते उघडणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पीक कर्ज वितरणात तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत झालेल्या दिरंगाईबद्दल काही बँकांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करण्यात आली. ॲक्सिस बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बंधन बँक आणि करूर वैश्य बँक यांना नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना देण्यात आले.

बैठकीत नाबार्ड, ओबीसी वित्त-विकास महामंडळ, कृषी विभाग आणि जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांचाही आढावा घेण्यात आला. निधी उपलब्धता, योजनांची अंमलबजावणी आणि त्यातील अडचणींबाबत चर्चा करण्यात आली.

कर्ज मंजुरी आणि नकार प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यावर भर देत, ज्या लाभार्थ्यांचे कर्ज अर्ज नाकारले जातील त्यांना त्यामागील नेमके कारण लेखी स्वरूपात कळविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिले. तसेच सर्व बँकांनी जबाबदारीने काम करत उद्दिष्टपूर्ती साध्य करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande